WIvsBAN : विंडिजचा बांगलादेशवर ४ धावांनी रोमांचक विजय! 
Latest

WIvsBAN : विंडिजचा बांगलादेशवर ४ धावांनी रोमांचक विजय!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : WIvsBAN : हॅली मॅथ्यूज (४ बळी), स्टेफनी टेलर (३) आणि एमी फ्लेचर (३) यांनी केलेल्या भेदक मा-याच्या जोरावर वेस्ट इंडिज महिला संघाने विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशवर अवघ्या ४ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या स्पर्धेतील त्यांचा हा तिसरा विजय आहे. विंडिजच्या या विजयामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला तीनपैकी दोन सामने जिंकणे आवश्यक असून त्यांना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावाच लागेल.

आयसीसी (ICC) महिला एकदिवसीय विश्वचषक २०२२ च्या १७ व्या सामन्यात वेस्ट इंडिजने एका रोमांचक सामन्यात बांगलादेशचा ४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५० षटकांत ९ गडी गमावून १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ४९.३ षटकांत सर्व विकेट गमावून १३६ धावाच करू शकला. वेस्ट इंडिजच्या हॅली मॅथ्यूजला तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. (WIvsBAN)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीर डायंड्रा डॉटिन आणि हेली मॅथ्यूज यांनी पहिल्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी केली. डॉटिन १७ धावा करून जहांआरा आलमची बळी ठरली, तर मॅथ्यूजही १८ धावा करून माघारी परतली. बांगलादेशच्या तगड्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजची फलंदाजी गारद झाली आणि ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. एका क्षणी संघाची धावसंख्या ७ बाद ७० होती, परंतु येथून शेमन कॅम्पबेल हिने एफी फ्लेचर (१७) सोबत आठव्या विकेटसाठी ३२ धावा आणि त्यानंतर नवव्या विकेटसाठी करिश्मा रामहैराक (७) सोबत ३६ धावा जोडल्या. कॅम्पबेल ५३ धावांवर नाबाद राहिली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजने ५० षटकांत ९ गडी गामावून १४० धावा केल्या. बांगलादेशकडून सलमा खातून आणि नाहिदा अख्तर यांनी २-२ विकेट पटकावल्या. तर रुमाना अहमद, रितू मोनी आणि जहाँआरा आलम यांच्या खात्यात १-१ विकेट आली. (WIvsBAN)

१४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही खराब झाली आणि सलामीवीर शमिमा सुलताना खातेही न उघडता बाद झाली. त्यानंतर शर्मिना अख्तर (१७)च्या रुपत दुसरा धक्का बसला. या दोघींना हेली मॅथ्यूजने पॅव्हेलेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर फरजाना हकने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ती २३ धावांवर बाद झाली. कर्णधार निगार सुलताना हिचा अडसर मॅथ्यूजने दूर केला. सुलताना २५ धावा करून बाद झाली. त्यानंतर झटपट विकेट पडल्या आणि बांगलादेशची धावसंख्या ७ बाद ८५ झाली. मात्र, खालच्या फळीतील सलमा खातून (२३) आणि नाहिदा अख्तर (नाबाद २५) यांनी विंडिजच्या गोलंदाजांचा सामना करत झुंज देत संघाला विजय मिळवून देण्यासाठी निकराचा प्रयत्न केला. शेवटच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज होती पण बांगलादेश संघाने शेवटची विकेट गमावून केवळ ३ धावा केल्या आणि सामना गमावला. वेस्ट इंडिजकडून हेली मॅथ्यूजने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ बळी घेतले. (WIvsBAN)

हॅली मॅथ्यूज ठरली विजयाची नायिका..

वेस्ट इंडिजच्या विजयाची नायिका ठरली हेली मॅथ्यूज. तिने १० षटकात केवळ १५ धावा देत ४ बळी घेतले. ही तिची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. तिच्याशिवाय कर्णधार स्टेफनी टेलरने २९ धावांत ३ बळी घेतले. त्याचवेळी एमी फ्लेचरनेही ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

वेस्ट इंडिजचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर

महिला विश्वचषक २०२२ मध्ये तिसरा विजय मिळवल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचे ६ गुण झाले असून त्यांनी भारताला मागे टाकले आहे. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढू शकतात. सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी टीम इंडियाला तीनपैकी दोन सामने जिंकावे लागतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ ४-४ विजयांसह अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT