पुढारी ऑनलाईन डेस्क : जोशुआ डिसिल्वाने झळकावलेले पहिलेवहिले शतक आणि त्यानंतर काईल मायर्स आणि केमा रोचने फेकलेल्या घातक गोलंदाजीच्या बळावर वेस्टइंडिजने इंग्लंडला तिस-या कसोटीत पराभवची धूळ चारली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी विंडिजने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता २८ धावांचे लक्ष्य गाठले आणि १० विकेट राखून मालिका कब्जा केला. जोशुआ डिसिल्वाला त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीर तर क्रेग ब्रॅथवेटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. (WI vs ENG Test)
तत्पूर्वी, इंग्लंडचा दुसरा डाव गडगडला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा सामना करण्यात पाहुणा इंग्लंडचा संघ अपयशी ठरला आणि १२० धावांच्या माफक धावसंख्येवर आटोपला. अॅलेक्स लीसने सर्वाधिक ३१ धावा केल्या. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने २२ धावांची खेळी केली. तर ख्रिस वोक्सनेही १९ धावा केल्या. इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. वेस्ट इंडिजच्या काइल मायर्सने पाहुण्या संघाला खिंडार पाडले आणि १८ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले. त्याला केमा रोचने चांगली साथ दिली. त्याने १० धावांमध्ये दोन फलंदाजांना माघारी धाडले. (WI vs ENG Test)
अशाप्रकारे वेस्ट इंडिजला केवळ २८ धावांचे माफक लक्ष्य मिळाले, जे त्यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण केले. क्रेग ब्रॅथवेटने नाबाद २० आणि जॉन कॅम्पबेलने नाबाद ६ धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात २०४ धावा केल्या होत्या. गोलंदाज शाकिब महमूदने सर्वाधिक धावा केल्या. ११ व्या क्रमांकावर खेळताना महमूदने ४९ धावा करत संघाचा डाव सावण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशिवाय जॅक लीचने नाबाद ४१ धावांची खेळी खेळली. वेस्ट इंडिजकडून जेडेन सील्सने ३ बळी घेतले. (WI vs ENG Test)
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात २९७ धावांची मजल मारली. जोशुआ दा सिल्वाने शतक झळकावताना नाबाद शतक झळकावले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने ३ बळी घेतले. यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १२० धावांत संपुष्टात आला आणि वेस्ट इंडिजने २८ धावा करून सामना जिंकला. (WI vs ENG Test)
जोशुआ डिसिल्वाने कठीण परिस्थितीत चांगली फलंदाजी करत संघासाठी पहिल्या डावात १०० धावांची नाबाद शतकी खेळी केली. तर, मेयर्सने संघासाठी दोन्ही डावांत सर्वाधिक सात बळी घेतले. त्याने पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.