मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी पक्षाच्या जेष्ठ मंत्र्यांची तातडीने बैठक घेतली. एक तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी मलिक यांच्यासोबत पक्ष असेल, अशी भूमिका त्यांनी घेतली. व आपल्या जेष्ठ मंत्र्यांसोबत खलबते केली.
पश्चिम बंगालमध्येही विरोधकांवर अशाच कारवाया झाल्या होत्या. त्यामुळे पवार यांनी या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बैठक सुरु असताना दूरध्वनीवरून चर्चा केली.
मलिक हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत. राज्यात भाजपाचे सरकार असताना प्रवक्ते म्हणून त्यांनी सरकारच्या कारभारावर बोट ठेवत एक वचक ठेवला होता. यामाध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सतत चर्चेत ठेवला होता. आता मंत्री पदावर असतानाही प्रवक्ते म्हणून ते केंद्र सरकार आणि राज्यातील भाजपा नेत्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. ईडीच्या अटकेमुळे सध्या मलिक अडचणीत असल्यामुळे बैठकीत उपस्थित असलेले जेष्ठ मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांनी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला.
मलिक यांना अटक झाली असल्यामुळे भाजपाने त्यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या विषयावरही बैठकीत चर्चा झाली. पण कोर्टाकडून अद्याप निर्णय नसल्यामुळे मलिक यांचा राजीनामा घेऊ नये, असे मत या बैठकीत मांडण्यात आले.
हे ही वाचा