पुढारी ऑनलाईन: गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने बदल जाणवत आहेत. मध्येच अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. यानंतर पुन्हा महाराष्ट्रासह, कोकण किनारपट्टी आणि गोव्याला मंगळवारपासून (दि.१४) विजांच्या गटगडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या भागात ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज IMD मुंबई विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे, कोकण आणि गोव्यात देखील १५, १६ मार्च दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटांसह हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तर १६ मार्च दरम्यान पश्चिम महाराष्ट्रसोडून उर्वरित महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान या भागात वाऱ्याचा वेग ताशी ३०-४० किमी असणार आहे.
१७ मार्च दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह, वादळी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ४ ते ५ दिवसांत कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घटणार असून, कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याचेही IMD मुंबईने सांगितले आहे.