नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या एकंदर ८ जागांपैकी विदर्भातील पाच मतदारसंघात शुक्रवारी (दि.२६) मतदान होत आहे. कडक उन्हासोबतच बदलते वातावरण, अवकाळी पावसाचे सावट या मतदानावर असून मतांचा टक्का वाढणार की पहिल्या टप्प्याप्रमाणेच कमी होणार, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड यासोबतच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ- वाशिम आणि पूर्व विदर्भातील वर्धा अशा पाच लोकसभा मतदारसंघात उद्या लोकसभा निवडणूक होत आहे. बुधवारी सायंकाळी निवडणूक प्रचारतोफा शांत झाल्या. एकीकडे पूर्व विदर्भात कडक उन्हाचा तडाखा, मतदारांची अनास्था यातून नागपूर, रामटेकसह पाच लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदान पाहायला मिळाले. शुक्रवारी होणारे मतदान महाविकास आघाडी की महायुती कोणाचे पारडे जड ठरविणार? हे येत्या ४ जूनला स्पष्ट होणार आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडल्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीत भाजपला फायदा होतो की काँग्रेस नव्या चेहऱ्यासह मराठवाड्यात कम बँक करते हे पाहणे महत्वाचे आहे. हिंगोलीत उमेदवार बदलल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाच लोकसभा मतदारसंघनिहाय विचार करता अमरावतीत विद्यमान खासदार नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार असून विरोधात काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे, प्रहारचे दिनेश बुब आणि आनंदराज आंबेडकर असा तर यवतमाळमध्ये महायुतीच्या राजश्री पाटील विरुद्ध मविआचे संजय देशमुख असा सामना होत आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस, महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे अमर काळे अशी लढत होत आहे. दुसरीकडे बुलढाणा मतदारसंघात विद्यमान शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे नरेंद्र खेडेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर असा तर अकोला मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील अशी लढत होत आहे.
हेही वाचा :