लंडन : जगाला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत देणार्या चार्ल्स डार्विनच्या दोन नोटबुकची केम्ब्रिज विद्यापीठातून चोरी झाली होती. आता कुणी तरी वीस वर्षांनंतर या नोटबुक्स परत दिल्या आहेत. विद्यापीठाने म्हटले आहे की ग्रंथालयाच्या आत कुणी तरी गुलाबी रंगाची पिशवी ठेवली होती. तिच्या आत या नोटबुक्स होत्या आणि त्यामध्ये ग्रंथपालासाठी 'हॅप्पी ईस्टर'चा संदेश लिहिला होता.
या कॉपीमध्येच डार्विनच्या प्रसिद्ध 'ट्री ऑफ लाईल'चे स्केच बनवलेले आहे. ही कॉपी 2001 नंतर गायब झाली होती. त्यावेळी कर्मचार्यांना वाटले होते की तिथे कुठेतरी ही कॉपी ठेवून ती विस्मरणात गेली असावी. स्थानिक जासुसांनी इंटरपोलला याबाबतची माहिती दिली व त्यानंतर या कॉपीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू करण्यात आला. या कॉपीची किंमत लाखो डॉलर्सची आहे. अचानक 9 मार्चला ही कॉपी ग्रंथपालाच्या कार्यालयाबाहेर मिळाली जिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. युनिव्हर्सिटी डायरेक्टर ऑफ लायब्ररी सर्व्हिसेज जेसिका गार्डनर यांनी सांगितले की या नोटबुक्स मिळाल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. डार्विनची ही दुर्मीळ कॉपी मिळाल्याचा आनंद शब्दांत सांगता येणारा नाही. डार्विनच्या सन 1859 मध्ये प्रकाशित झालेल्या 'ओरिजिन ऑफ स्पेसिज'मुळे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जगासमोर आला. माणूस हा माकडांपासून उत्क्रांती होऊन विकसित झाला असे डार्विनने म्हटले होते.