विश्वसंचार

अक्कलदाढेने खरंच अक्कल येते?

Shambhuraj Pachindre

लंडन : काही काही शब्दांबाबत आपण वर्षानुवर्षे गैरसमज बाळगून असतो. त्यामध्येच अक्कलदाढेचा समावेश आहे. 'चष्मेबद्दूर' शब्दाचा जसा चष्म्याशी काडीचाही संबंध नसतो तसाच अक्कलदाढेचा अक्कलेशी संबंध नसतो! अनेकांना वाटते की अक्कलदाढ आल्याने अक्कल वाढते. अर्थातच तसे काही नसते; पण थोडी अक्कल वाढल्यावर म्हणजेच वयाच्या सतरा ते 21 व्या वर्षापर्यंत ही दाढ येत असल्याने तिला 'अक्कलदाढ' म्हटले जाते.

प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या तोंडात एकूण 32 दात असतात. यामध्ये चार (दोन वरच्या बाजूस आणि दोन खालच्या बाजूस) अक्कलदाढा येतात. चारही कोपर्‍यात हिरड्यांच्या शेवटी या दाढा येतात. या दाढेमुळे समजूतदारपणा, विचारक्षमता किंवा बुद्धिमत्ता वगैरे वाढत नाही हे संशोधनातूनही स्पष्ट झालेले आहे. उलट ही दाढ बर्‍याच वेळा त्रासदायकच ठरत असते. हिरडीच्या सर्वात शेवटच्या टोकाला म्हणजेच तोंडाच्या अगदी आतील बाजूस ही दाढ येत असल्याने तिची विशेष काळजी घ्यावी लागते.

अक्कलदाढ आलेल्या भागात थोडीशी समस्या जरी निर्माण झाली तरी तिचे रूपांतर तीव्र वेदनांमध्ये होते. अक्कलदाढ ही तिच्यासमवेत अनेक समस्याही घेऊन येते. अमेरिकेत दरवर्षी अक्कलदाढ काढून टाकण्यासाठी सुमारे एक कोटी शस्त्रक्रिया होतात. अक्कलदाढेने ज्या समस्या निर्माण होत असतात त्यामध्ये कॅव्हिटी, संसर्ग, दातांच्या आसपासचा भाग खराब होणे आदींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT