बीजिंग : जवळजवळ शून्य वजन असलेले ‘न्यूट्रिनो कण’ हे आपल्या शरीरातूनही जात असतात; पण आपल्याला त्यांची गंधवार्ताही नसते. कोणतीही खूण मागे न ठेवणार्या या कणांना ‘भूत कण’ असेही संबोधले जाते. आता अशा कणांचा छडा लावणार्या जगातील सर्वात मोठ्या न्यूट्रिनो डिटेक्टरने जगाचे लक्ष वेधले आहे. या न्यूट्रिनो डिटेक्टरचे पहिले निष्कर्ष नुकतेच प्रकाशित झाले असून, त्यांनी न्यूट्रिनो पॅरामीटर्सचे आतापर्यंतचे सर्वात अचूक मापन सादर केले आहे. दक्षिण चीनमधील ‘जियांगमेन अंडरग्राऊंड न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी’( JUNO) हे डिटेक्टर अवघ्या दोन महिन्यांहून कमी काळ चालवल्यानंतर, संशोधकांना न्यूट्रिनोच्या विविध प्रकारांचे किंवा ‘फ्लेवर्स’चे पॅरामीटर्स अभूतपूर्व अचूकतेने मोजता आले आहेत.
या निष्कर्षांमुळे दोन महत्त्वाच्या न्यूट्रिनो पॅरामीटर्सचे मूल्य अधिक निश्चित झाले आहेः मिक्सिंग अँगल: वेगवेगळ्या ‘न्यूट्रिनो वस्तुमान स्थिती’ न्यूट्रिनो फ्लेवर्स तयार करण्यासाठी कशा एकत्र येतात, याचे वर्णन करणारा कोन. वस्तुमान स्थितींमधील फरक : या वस्तुमान स्थितींच्या वर्गातील फरक. JUNO चे उप-प्रवक्ते जिओआचिनो रानुची यांनी सांगितले,JUNO सुरू करण्यापूर्वी, हे पॅरामीटर्स प्रयोगांच्या दीर्घ मालिकेतून आले होते... अर्ध्या शतकाचे प्रयत्न या दोन पॅरामीटर्सच्या अंकीय मूल्यात समाविष्ट आहेत. केवळ 59 दिवसांत आम्ही 50 वर्षांच्या मापनावर मात केली आहे. यावरून JUNO किती शक्तिशाली आहे याची कल्पना येते.’JUNO चे हे पहिले निष्कर्ष arXiv या प्रिंट-पूर्व सर्व्हरवर प्रकाशित झाले असून, ते पीअर रिव्ह्यूसाठी ‘चायनीज फिजिक्स सी’ या जर्नलकडे सादर करण्यात आले आहेत.
न्यूट्रिनो हे ज्ञात कणांपैकी कदाचित सर्वात रहस्यमय कण आहेत. दर सेकंदाला अब्जावधी न्यूट्रिनो आपल्या शरीरातून जातात. मात्र, ते तुमच्याशी किंवा इतर कोणत्याही पदार्थाशी क्वचितच संवाद साधतात आणि त्यांचे वजन जवळजवळ शून्य असते, ज्यामुळे त्यांना ‘भूत कण‘ हे टोपणनाव मिळाले आहे. बहुतेक न्यूट्रिनो कोणतेही चिन्ह न ठेवता डिटेक्टरमधून जातात, त्यामुळे न्यूट्रिनोचा अभ्यास करणे सर्वात कठीण आहे. तरीही, भौतिकशास्त्रज्ञांना न्यूट्रिनोबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे.
कारण, ते कणांच्या भौतिकशास्त्राच्या स्टँडर्ड मॉडेलला आव्हान देऊ शकतात. स्टँडर्ड मॉडेल हे उप-अणु जगाचे आपले सर्वोत्तम स्पष्टीकरण असले, तरी ते पूर्ण नाही. या मॉडेलने न्यूट्रिनोना वस्तुमान असेल याचा अंदाज लावला नव्हता. या भूतकणांना वस्तुमान असते (ज्यासाठी 2015 चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषक प्रदान करण्यात आले) हे न्यूट्रिनो ऑसिलेशन नावाच्या घटनेमुळे सिद्ध झाले. न्यूट्रिनो तीन फ्लेवर्समध्ये (इलेक्ट्रॉन, म्यूऑन आणि टाऊ) येतात आणि ते काळ आणि अवकाशातून प्रवास करताना आपली ओळख बदलतात. या विचित्र घटनेचे कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही; पण ती नवीन, रोमांचक भौतिकशास्त्राची गुरूकिल्ली असू शकते.