लंडनः ग्रीनलँडमध्ये बर्फ पडतो आणि आईसलँड हिरवागार आहे, असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. मुळात या दोन्ही देशांची नावं ज्यावेळेस ठेवण्यात आली, त्यावेळेस त्यामागे काही विशेष हेतू होता. विशिष्ट हेतूने जागांना नावं ठेवली खरी, पण मग पुढे हीच नावं कायम राहिली, जी त्यांना शोभणारी नाहीत! आज ग्रीनलँडमध्ये बर्फ म्हणजेच बर्फाची पांढरी चादर दिसून येते, तर आईसलँडमध्ये नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ दिसते. या दोन्ही देशांची नावं अशी का ठेवण्यात आली आणि आता असं विरोधाभास असलेलं चित्र का दिसतं, हे जाणून घेऊयात...
ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. ग्रीनलँडचे एकूण क्षेत्रफळ 21.6 लाख चौरस किलोमीटर आहे. विशेष म्हणजे ग्रीनलँडचा 80 टक्के भाग बर्फाने व्यापलेला आहे. ग्रीनलँडचा बहुतेक भाग बर्फ आणि हिमनद्यांनी वेढलेला आहे. या नावामागे एक इतिहास आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की, सुमारे 25 लाख वर्षांपूर्वी हे ठिकाण हिरवेगार होते. काही दाव्यांनुसार सुमारे 982 साली भटकंती करणार्या ‘एरिक द रेड’ला नॉर्वे आणि आईसलँडमधून हाकलून लावण्यात आले.
त्याने एक नवीन भूमी शोधली. हीच भूमी आज ‘ग्रीनलँड’ नावाने ओळखळी जाते. खरं तर त्याला माहीत होते की, हा परिसर पूर्णपणे बर्फाने व्यापलेला आहे; परंतु तिथे लोकांनी येऊन वसाहत करावी, अशी त्याची इच्छा होती. म्हणून, त्याने त्याला ‘ग्रीनलँड’ असे आकर्षक नाव दिले. या नावाच्या माध्यमातून लोकांना हा एक हिरवा, सुपीक आणि राहण्यास योग्य क्षेत्र आहे, असं वाटून येथे वसाहत वाढेल या हेतूनेच हे नाव देण्यात आलं. या उलट परिस्थिती आईसलँडची आहे. आता ‘आईसलँड’ नाव ऐकून असे वाटेल की, येथे सर्वत्र फक्त बर्फ आणि बर्फच असेल; परंतु प्रत्यक्षात असं नाहीये.
इथे म्हणजेच आईसलँडवर जिथेही पहाल तिथे तुम्हाला फक्त हिरवळ दिसते. आईसलँडमध्ये गरम पाण्याचे झरे आणि ज्वालामुखी असलेले प्रांतदेखील आहेत. एका दाव्यानुसार, नवव्या शतकात संशोधक ’हृाफना-फ्लोकी विल्गेरडार्सन’ आईसलँड शोधण्यासाठी आला होता. प्रवासादरम्यान त्याला काही अडचणी आणि थंड हवामानाचा सामना करावा लागला. तो भटकंतीदरम्यान उंच पर्वतावर चढताच त्याला दिसले की सर्वत्र बर्फ आहे, म्हणूनच त्याने या भूमीचे नाव ‘आईसलँड’ ठेवले.