तिरुवनंतपूरम : जगाच्या पाठीवर स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य असलेली काही गावं आहेत. सर्वात स्वच्छ गाव, झोपाळूंचे गाव, केवळ महिलांचे गाव वगैरे गावं पाहायला मिळतात. केरळमध्ये असेच ‘जुळ्यांचे गाव’ आहे. हे गाव मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही हे आहे, जे आता ‘जुळ्या मुलांचे गाव’ म्हणूनही ओळखले जाते. येथे, तुम्हाला प्रत्येक दुसर्या घरात जुळी मुले दिसतील आणि म्हणूनच हे गाव जगभर प्रसिद्ध आहे. अहवालांनुसार, कोडिन्ही गावात सुमारे 2000 कुटुंबं राहतात आणि आतापर्यंत येथे 550 हून अधिक जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे.
2008 मध्ये जेव्हा इथला डेटा पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आला, तेव्हा सुमारे 280 जुळ्या मुलांची नोंदणी झाली होती; परंतु आता ही संख्या दुप्पट झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, येथे जुळ्या मुलांचा जन्म तीन पिढ्यांपासून सुरू आहे. भारतात सरासरी 1000 मुलांमागे फक्त 9 जुळे जन्माला येतात, तर या गावात ही संख्या 1000 मध्ये 45 एवढी आहे. यामुळेच हे गाव केवळ भारतातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय आहे. कोडिन्हीच्या रस्त्यांवर चालताना तुम्हाला सर्व वयोगटातील जुळे भावंडं आढळतील. गावातील शाळांची परिस्थिती अशी आहे की, तिथे 80 हून अधिक जुळी मुले शिकतात.
कधीकधी शिक्षकांचाही मुलांना ओळखण्यात गोंधळ उडतो. इतक्या मोठ्या संख्येने जुळ्या मुलांचे अस्तित्व पाहून शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. कोडिन्ही गावातील या अनोख्या घटनेला समजून घेण्यासाठी भारत, जर्मनी आणि लंडनमधील शास्त्रज्ञांची एक टीम 2016 मध्ये येथे आली होती. त्यांनी गावकर्यांचे डीएनए, केस आणि लाळेचे नमुने घेऊन संशोधन केले; परंतु आतापर्यंत कोणतेही ठोस कारण सापडलेले नाही.
डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, ही घटना आनुवंशिक किंवा पाण्याच्या वातावरणात असलेल्या घटकाशी संबंधित असू शकते; परंतु त्याचे वैज्ञानिक कारण आजपर्यंत स्पष्ट झालेले नाही. कोडिन्ही हे असे एकमेव गाव नाही. नायजेरियातील इग्बो-ओरा हे देखील जुळ्या मुलांसाठी प्रसिद्ध असे गाव आहे, येथे 1,000 जन्मांमध्ये 145 जुळ्या मुलांचा जन्म होतो. त्याचप्रमाणे ब-ाझीलच्या कॅन्डिडो गोडोईमध्येही जुळ्या मुलांचा दर असामान्यपणे जास्त आहे. तथापि, कोडिन्ही या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे. गावातील ज्येष्ठांच्या मते, कोडिन्हीमध्ये जुळ्या मुलांचा जन्म सुमारे 60-70 वर्षांपूर्वी सुरू झाला. हळूहळू, यामध्ये इतकी वाढ झाली की आता हे गाव जुळ्या मुलांसाठी ओळखले जाऊ लागले आहे.
गावाचे हे अनोखे वैशिष्ट्य लक्षात घेऊन, 2008 मध्ये येथे ‘ट्विन्स अँड किन एसोसिएशन’ (TAKA)’ ची स्थापना करण्यात आली. जुळ्या मुलांच्या कुटुंबांना मदत करणे आणि शिक्षण आणि आरोग्यासारख्या सुविधा सुधारणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.