

न्यूयॉर्क : आपल्याकडे आयुर्वेदात तुळशीचा वापर शरीराला अनेक आजारांपासून तसेच तणाव आणि असंतुलनाशी संबंधित आजारांपासूनही बचाव करण्यासाठी केला जातो. तुळशीचं बॉटनिकल नाव ओसीमम टेनुइफ्लोरम आहे. अमेरिकेतील अलीकडच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, तुळशीच्या पानांचा अर्क हा शरीरातली कॉर्टिसोल, म्हणजेच ‘स्ट्रेस हार्मोन’ची पातळी 36 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.
कॉर्टिसॉल हा अधिवृक्क ग्रंथींद्वारे तयार होणारा संप्रेरक आहे. त्याला अनेकदा ‘तणाव संप्रेरक’ असं म्हणतात. कॉर्टिसोल आरोग्याच्या अनेक पैलूंवर परिणाम करू शकतो. कॉर्टिसोलचे उच्च किंवा कमी प्रमाण आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. जेव्हा आपलं शरीर ताणतणावात असते तेव्हा हे संप्रेरक स्रावित होतं आणि प्रतिक्रिया निर्माण करतं. शरीरात, वाढलेली कॉर्टिसॉल पातळी चिंता, थकवा, कमी झालेली प्रतिकारशक्ती आणि कमी झोप यासारख्या अनेक गंभीर परिस्थितींशी संबंधित असते.
आपल्या शरीराच्या एकूण देखभालीसाठी कॉर्टिसॉल कमी करण्याचे नैसर्गिक मार्ग शोधणे आवश्यक आहे. अमेरिकन संशोधकांनी केलेल्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन जर्नलमध्ये एका अभ्यासात असं आढळून आलं की, तुळस शरीरातील कॉर्टिसोलची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकते. ‘अ रँडमाईज्ड, डबल-ब्लाईंड, प्लेसिबो-कंट्रोल ट्रायल इनव्हेस्टिंग द इफेक्टस् ऑस अ ओसिमम टेनुइफ्लोरम एक्सट्रॅक्ट ऑन स्ट्रेस, मूड’ आणि ‘स्लीप इन स्ट्रेस’ या नावाने प्रकाशित झालेल्या अभ्यासात ही बाब उघळकीस आली आहे. हा अभ्यास 18 ते 65 वयोगटातील 100 लोकांवर करण्यात आला.
या संशोधनाचा उद्देश तणावाच्या वेळी शरीराच्या प्रतिसादावर औषधी वनस्पतीचा कसा परिणाम होतो हे ठरवणे हा होता. सहभागींकडून घेतलेल्या केस आणि लाळेच्या नमुन्यांचा वापर करून निष्कर्ष काढण्यात आला. 8 आठवड्यांच्या सखोल चाचणीनंतर, तुळशीचा अर्क घेतलेल्या गटाच्या केसांच्या कोर्टिसोलच्या पातळीत लक्षणीय 36% घट दिसून आली. हे दीर्घकालीन ताण पातळीत मोठी घट दर्शवते. संशोधकांनी लाळेच्या कोर्टिसोलचीदेखील चाचणी केली. ते देखील कमी होते, म्हणजेच सहभागींचे शरीर शांतपणे ताण हाताळत होते. ताणतणावानंतर रक्तदाबाची पातळीदेखील कमी झाली.