न्यूयॉर्क : संशोधकांनी आतापर्यंतचा सर्वात बारकाईने तयार केलेले डिजिटल मॉडेल वापरून टायटॅनिक जहाजाच्या शेवटच्या क्षणांची पुनर्रचना केली आहे. या नव्या माहितीचा खुलासा ‘टायटॅनिक : द डिजिटल रिझरेक्शन’ या नॅशनल जिओग्राफिकच्या नवीन माहितीपटात करण्यात आला आहे.
टायटॅनिक हे 883 फूट (270 मीटर) लांब जहाज ‘न बुडणारे’ म्हणून ओळखले जात होते; परंतु आजपासून 113 वर्षांपूर्वी हिमनगाला धडक दिल्यानंतर ते दोन तुकडे होऊन बुडाले. या माहितीपटात जहाजावरील काही शूर क्रू सदस्यांच्या शौर्यकथादेखील दाखवल्या आहे. नॅशनल जिओग्राफिकच्या म्हणण्यानुसार, अत्याधुनिक पाणबुडी स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल 7,15,000 डिजिटल प्रतिमा संकलित करून 1:1 प्रमाणात अचूक डिजिटल मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल इतके तपशीलवार आहे की, त्यामध्ये प्रत्येक रिव्हेटसुद्धा (लोखंडी खिळा) दाखवला आहे.
‘आरएमएस टायटॅनिक’ने 10 एप्रिल 1912 रोजी बि-टनमधील साऊथॅम्प्टन येथून न्यूयॉर्कसाठी आपला पहिला प्रवास सुरू केला होता. जहाजावर 2,240 प्रवासी आणि क्रू होते. चार दिवसांनी एका हिमनगाला टक्कर देऊन ते गंभीररीत्या नुकसान झाले. उजव्या बाजूला अनेक भगदाडं झाली आणि परिणामी जहाज समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत 1,500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हे जहाज अटलांटिक महासागराच्या सुमारे 12,467 फूट (3,800 मीटर) खोल समुद्रतळाशी अजूनही आहे. 2022 मध्ये ‘मॅजेलन’ या सखोल समुद्री नकाशांकन करणार्या कंपनीने सॉनार इमेजिंगच्या साहाय्याने हे थ-ी-डी डिजिटल मॉडेल तयार केले.
‘अटलांटिक प्रॉडक्शन्स’ने मॅजेलन टीमचा तीन आठवड्यांचा स्कॅनिंग प्रकल्प चित्रित केला आणि 2023 मध्ये हे मॉडेल प्रथमच सादर करण्यात आले. या माहितीपटात संशोधक या डिजिटल मॉडेलद्वारे टायटॅनिकच्या दुर्घटनेचे अनेक पैलू समजून घेतात. उदाहरणार्थ, त्यांनी जहाजाचे तुकडे जोडून हे निष्कर्ष काढले की, जहाज सरळ दोन तुकड्यांमध्ये न फाटता तीव-तेने तुटले.
संशोधकांना एक स्टीम व्हॉल्व्ह उघडे असल्याचे आढळले, ज्यामुळे हे सिद्ध होते की, इंजिनिअर शेवटपर्यंत काम करत होते, विद्युतप्रवाह चालू ठेवून आपत्ती संदेश प्रसारित होत राहावा म्हणून त्यांनी आपले प्राण पणाला लावले. या भग्नावशेषांमध्ये सापडलेल्या अनेक वैयक्तिक वस्तू जसे की, खिशातील घड्याळ, पर्सेस आणि एका शार्कच्या दातांचा लॉकेट यांचा शोध घेतला गेला आणि त्यांचे मूळ मालक कोण होते, याचा मागोवा घेण्यात आला. जेम्स कॅमेरूनच्या 1997 च्या ‘टायटॅनिक’ चित्रपटातील ‘हार्ट ऑफ द ओशन‘ हे निळ्या हिर्याचे लॉकेट मात्र केवळ कल्पनेतील होते आणि वास्तविक भग्नावशेषांमध्ये ते सापडलेले नाही.