

लंडन : टायटॅनिक जहाज बुडण्यापूर्वी कर्नल आर्किबाल्ड ग्रेसी यांनी लिहिलेले एक पत्र ब्रिटनमधील लिलावात विक्रमी दराने विकले गेले. हे पत्र विल्टशायरमधील हेनरी एल्ड्रिज अँड सन या लिलाव केंद्राने 3 लाख पौंड (सुमारे 3.41 कोटी रुपये) या अवाढव्य किमतीत विकले. सुरुवातीला या पत्राची किंमत 60,000 पौंड (सुमारे 68 लाख रुपये) अपेक्षित होती; मात्र ती पाचपट अधिक मिळाली.
कर्नल ग्रेसी टायटॅनिकच्या पहिल्या प्रवासात फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत होते. त्यांनी या भीषण आपत्तीवर आधारित ‘द ट्रुथ अबाऊट द टायटॅनिक ’ नावाचे पुस्तक लिहिले, ज्यात 1500 लोकांच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यांनी प्रवासाच्या सुरुवातीलाच लिहिलेले हे पत्र भविष्यसूचक मानले जाते. कारण, ग्रेसी यांनी लिहिले होते, ‘हे जहाज भव्य आहे; पण माझी यात्रा पूर्ण होईपर्यंत मी यावर मत मांडणार नाही.’ ग्रेसी यांनी हे पत्र 10 एप्रिल 1912 रोजी साऊथॅम्प्टनहून टायटॅनिकवर चढल्यानंतर, केबिन C51 मधून लिहिले होते.
11 एप्रिल रोजी जहाज आयर्लंडच्या क्वीन्सटाऊन बंदरात थांबले असताना हे पत्र टपालाद्वारे पाठवले गेले. हे पत्र लंडनमधील वाल्डोर्फ हॉटेलमध्ये असलेल्या त्यांच्या एका परिचिताला पाठवले होते. हेनरी एल्ड्रिज अँड सन ने या पत्राला अत्यंत दुर्मीळ आणि संग्रहालयात ठेवण्याजोगा अनमोल ठेवा म्हटले आहे. त्यांनी सांगितले, ‘हे पत्र टायटॅनिकच्या सर्वात प्रसिद्ध वाचलेल्या प्रवाशाने लिहिले आहे आणि याला अतुलनीय ऐतिहासिक महत्त्व आहे.’ पत्रात ग्रेसी यांनी टायटॅनिकच्या तुलनेत ओशियानिक या दुसर्या जहाजाची प्रशंसा केली आहे.
प्रवासादरम्यान ग्रेसी यांनी अनेक एकट्या महिला प्रवाशांना मदत केली. ते एका महिला व तिच्या तीन बहिणींना मदतीसाठी सोबत होते, ज्या नंतर वाचल्या. 14 एप्रिल रोजी ग्रेसी यांनी स्क्वॅश खेळले, पोहले, चर्चमध्ये गेले आणि प्रवाशांशी संवाद साधला. रात्री 11.40 वाजता जेव्हा टायटॅनिकचे इंजिन थांबले, तेव्हा ते जागे झाले आणि त्यांनी महिलांना आणि लहान मुलांना लाइफबोटमध्ये चढवले व त्यांना उबदार पांघरुणे दिली.जेव्हा टायटॅनिक उत्तर अटलांटिक महासागरात बुडले, तेव्हा ग्रेसी उलटलेल्या लाइफबोटवर चढले.
आसपास थंड पाण्यात लोक मदतीसाठी हाक देत होते; मात्र लाइफबोटवरील लोकांनी भीतीपोटी अधिक लोकांना घेतले नाही. ग्रेसी यांनी लिहिले, ‘कुणीही मदत न मिळाल्याची तक्रार केली नाही.’ एका व्यक्तीने फक्त म्हटले, ‘ठीक आहे, शुभेच्छा आणि देव तुमचे भले करो.’ नंतर ग्रेसी कार्पेथिया या जहाजाद्वारे न्यूयॉर्कला पोहोचले आणि त्यांनी आपली कथा लिहायला सुरुवात केली. मात्र, थंडी आणि जखमांमुळे त्यांची प्रकृती ढासळली आणि 2 डिसेंबर 1912 रोजी ते कोमामध्ये गेले. दोन दिवसांनी, मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतींमुळे त्यांचे निधन झाले.