Spanish treasure ship San Jose file photo
विश्वसंचार

SanJose Spanish treasure ship | स्पॅनिश जहाजात होता 200 टनांचा सोने, चांदी व हिर्‍यांचा खजिना!

प्राचीन काळातील खजिन्याच्या शोधाबाबत नेहमीच लोकांना कुतूहल असते. असाच एक खजिना कोलंबियाच्या किनार्‍याजवळ सापडला होता.

मोहन कारंडे

San Jose Spanish treasure ship

लंडन ः प्राचीन काळातील खजिन्याच्या शोधाबाबत नेहमीच लोकांना कुतूहल असते. असाच एक खजिना कोलंबियाच्या किनार्‍याजवळ सापडला होता. आता त्याबाबतचे नवे संशोधन झाले आहे. या सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांविषयी नव्या तपशिलांनी हे स्पष्ट केले आहे की ही नाणी सन 1708 मध्ये ब्रिटिश युद्धनौकांशी झालेल्या तोफांच्या चकमकीत बुडालेल्या संजोस या स्पॅनिश खजिनाच्या जहाजातीलच आहेत. या गॅलेअन जहाजामध्ये जवळपास 200 टन (180 मेट्रिक टन) सोनं, चांदी आणि मौल्यवान हिरे होते. या खजिन्याची आजची अंदाजे किंमत जवळपास 17 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

जहाजाभोवती विखुरलेली होती सोन्याची नाणी

कोलंबियाचे सरकार या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यासाठी एक संग्रहालय उभारण्याचा मानस धरून आहे. मात्र, या खजिन्यावर स्पेन सरकारसह इतरही काही दावे करण्यात येत आहेत. स्पेन सरकारचा युक्तिवाद आहे की, त्यांची लष्करी जहाजे कितीही जुनी असली, तरी ती त्यांच्या मालकीचीच आहेत. या संदर्भात ‘अँटिक्विटी’ नावाच्या वैज्ञानिक जर्नलमध्ये 10 जून रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासात कोलंबियाच्या नौदलातील व इतर अधिकृत संस्थांतील संशोधक सहभागी होते. त्यांनी 2021 व 2022 मध्ये करण्यात आलेल्या चार पाणबुडी मोहिमांदरम्यान, अंदाजे 1,970 फूट (600 मीटर) खोल समुद्रात जहाजाभोवती विखुरलेली सोन्याची नाणी आणि अन्य अवशेषांचे उच्च-गुणवत्तेच्या फोटोंच्या आधारे विश्लेषण केले. या अभ्यासात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ही नाणी आणि अवशेष 1708 मध्ये बुडालेल्या संजोस जहाजाचेच आहेत.

हाताने ठोकलेल्या नाण्यांचा इतिहास काय? 

संशोधकांनी सांगितले की, या नाण्यांचा व्यास सरासरी 1.3 इंच (32.5 मिमी) असून, वजन अंदाजे 27 ग्रॅम (सुमारे 1 औंस) आहे. नाण्यांवर एक मोठा यरुशलेम क्रॉस आणि त्याच्या भोवती चार लहान क्रॉस, तसेच किल्ले आणि सिंह असलेले ढाल चितारले आहे. दुसर्‍या बाजूला ‘हर्क्युलिसच्या मुकुटधारी स्तंभांखाली समुद्राची लाट’ ही लक्षणीय रचना दिसून आली, जी पेरूच्या लिमा मिंटची खास ओळख आहे. काही नाण्यांवर 1707 मधील एक विशिष्ट तपासणी छाप आढळून आली आहे, जी त्या काळातील धातू तपासणार्‍या अधिकार्‍याने दिली होती. या नाण्यांची तुलना इतिहासातील नोंदींसोबत केल्यावर स्पष्ट झाले की, ही नाणी संजोस जहाजातीलच आहेत. अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॅनिएला वर्गास अरीझा यांनी सांगितले की, अशा ‘हाताने ठोकलेल्या, अनियमित आकाराच्या’ नाण्यांना इंग्रजीत cobs तर स्पॅनिशमध्ये Macuquinas म्हटले जाते आणि अमेरिकेतील वसाहती कालखंडात हीच मुख्य चलनप्रणाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT