लंडन : जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि विशेषतः त्यांची पत्नी अॅन हॅथवे आणि मुलगा हॅमनेट यांच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. याच अपुर्या माहितीच्या आधारावर मॅगी ओ’फॅरेल यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित ‘हॅमनेट’ हा नावाचा एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शेक्सपिअरच्या वैयक्तिक आयुष्य आणि कुटुंब याविषयी आजवर असणारे रहस्य यावर चर्चा सुरू झाली आहे. शेक्सपिअरच्या कुटुंबाबद्दलची काही थोडी का होईना पण ठोस माहिती उपलब्ध आहे.
त्याचा विवाह 1582 मध्ये झाला. 18 वर्षांच्या शेक्सपिअरने त्यांच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठ्या असलेल्या 26 वर्षांच्या अॅन हॅथवेशी लग्न केले. लग्नाच्या वेळी अॅन गर्भवती होत्या. त्यांना तीन अपत्ये होती. पहिली मुलगी सुझॅना आणि नंतर ज्युलिथ आणि हॅमनेट हे जुळे. 1596 मध्ये, हॅमनेट अवघ्या 11 वर्षांचा असताना मरण पावला. त्याचा दफनविधी 11 ऑगस्ट रोजी झाला. शेक्सपिअर त्यावेळी त्यांच्या नाट्यमंडळीसोबत लंडनमध्ये होता. त्यामुळे तो मुलाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकला नाही. अॅन हॅथवे हिच्या वडिलांच्या मृत्युपत्रात तिचा (अॅन) उल्लेख अॅग्नेस असा आहे, तर इतर सर्व नोंदींमध्ये अॅन असा आहे. हॅमनेटच्या मृत्यूनंतर सुमारे चार वर्षांनी, शेक्सपिअरने त्यांचे जगप्रसिद्ध नाटक ‘हॅम्लेट’ लिहिले. हॅमनेट आणि हॅम्लेट ही नावे त्याकाळी एकसारखी वापरली जात असल्याने, अनेक विद्वानांचा असा कयास आहे की, मुलाच्या मृत्यूचे दुःख हेच या नाटकाच्या निर्मितीमागील मुख्य प्रेरणा होते. दुःख सहन करण्याचा एक मार्ग म्हणून हे नाटक लिहिले गेले, ज्यामुळे शेक्सपिअरला आपल्या मुलाला रंगमंचावर निरोप देता आला.
इतिहासाने अॅन हॅथवे यांना निरक्षर, शेतकर्याची मुलगी, जिने शेक्सपिअरला लग्नाच्या बंधनात अडकवले अशा नकारात्मक भूमिकेत पाहिले आहे. कादंबरीकार ओ’फॅरेल यांच्या मते, अॅन/अॅग्नेस या एक वनौषधी तज्ज्ञ होत्या, ज्यांना नैसर्गिक औषधांचे आणि भविष्याचे ज्ञान होते. त्यांनी शेक्सपिअरच्या अनेक नाटकांमध्ये (उदा. ओफेलियाच्या संवादात) औषधी वनस्पतींच्या उल्लेखातून आपली छाप सोडली असावी, असे ‘हॅमनेट’मध्ये दर्शवले आहे.