नवी दिल्ली : आपल्या अवती-भोवती अनेक लोक असे असतात जे एकटेच बडबडत बसलेले असतात. ज्याकडे समाजात अनेकदा विचित्र किंवा वेडेपणाचे लक्षण म्हणून पाहिले जाते. मात्र, मानसशास्त्रज्ञांच्या मते ही सवय वेडेपणाची नसून, एक सामान्य आणि प्रभावी मानसिक क्रिया आहे. ही सवय अनेक अर्थांनी आपली बुद्धिमत्ता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवते. याला मानसशास्त्राच्या भाषेत सेल्फ-टॉक किंवा इनर स्पीच म्हटले जाते.
जेव्हा आपण स्वतःशी बोलतो, तेव्हा आपण आपले विचार व्यवस्थित करत असतो, समस्यांकडे वेगवेगळ्या द़ृष्टिकोनातून पाहत असतो आणि आपल्या पुढील पावलांची योजना आखत असतो. ही क्रिया मेंदूला आपल्या डोक्यात विखुरलेल्या माहितीवर वेगाने प्रक्रिया करण्यास मदत करते. मुलांमध्ये होणार्या बौद्धिक विकासाचादेखील हा एक नैसर्गिक भाग आहे. त्यामुळे ही सवय बर्याचदा अधिक एकाग्रता आणि आंतरिक मार्गदर्शनाचे संकेत देते.
मानसशास्त्रानुसार, स्वतःशी बोलणे हा एकाग्रता वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गुंतागुंतीच्या कामादरम्यान स्वतःला सूचना देता, जसे की आधी हे कर, मग ते, तेव्हा तुमचे मन योग्य मार्गावर राहते आणि लक्ष विचलित होण्यापासून बचाव होतो.
यामुळे समस्या सोडवण्याची क्षमताही वाढते. कारण, जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलता तेव्हा तुम्ही तुमची समस्या अधिक चांगल्या प्रकारे ऐकून तिला तर्कशुद्ध पद्धतीने सोडवता आणि वेगवेगळ्या उपायांचे मूल्यांकन करता. सेल्फ-टॉक आपल्या विस्कळीत विचारांना स्पष्टता देण्याचे काम करते. आपल्या मनात वेगाने येणारे विचार जेव्हा आपण मोठ्याने बोलतो, तेव्हा ते अधिक व्यवस्थित स्वरूप घेतात. स्वतःशी बोलणे हा तणाव आणि भावनांचे व्यवस्थापन करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. कठीण परिस्थितीत स्वतःला सकारात्मक शब्द (उदा. तू हे करू शकतोस, किंवा शांत हो) बोलल्याने आत्मविश्वास वाढतो आणि चिंता कमी होते. याला सकारात्मक सेल्फ-टॉक म्हणतात, जो कॉर्टिसोल (तणाव वाढवणारा हार्मोन) पातळी कमी करून मानसिक आरोग्य सुधारतो. स्वतःशी बोलणे सामान्य असले, तरी जेव्हा व्यक्ती वास्तवापासून दूर जाऊन बोलू लागते किंवा तिला असे आवाज ऐकू येतात जे प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत, तेव्हा ही चिंतेची बाब बनू शकते.