

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरातील सोमवारी संध्याकाळ नेहमीप्रमाणेच गजबजलेली होती. दिल्लीकर नागरिकांसह पर्यटकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेट्रो स्टेशनही जवळच असल्याने घरी परतणार्या नोकदारांची गर्दी होती. रस्ते ओसंडून वाहत होते. जो तो लगबगीत होता.
कानठळ्या बसवणारा तो स्फोट झाला आणि प्रत्येकाचा थरकप उडाला. 6.52 च्या सुमारास झालेल्या या स्फोटापाठोपाठ प्रचंड आग उसळली. तिने पाठोपाठ काही गाड्याही लपेटून घेतल्या. काहीच समजनेसा झाले. जो तो सैरावैरा धावू लागला. अनेक गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. प्रत्यक्ष घटनास्थळी असलेल्यांनी सांगितलेले अनुभव तर सुन्न करणारे होते. प्रत्यक्षदर्शी आणि या घटनेत जखमी झालेल्यांनी सांगितले की, स्फोट इतका भयंकर होता की, आसपासच्या गाड्यांच्या काचा फुटल्या, काहीजण हवेत उडाले आणि आपटले.
पहाडगंजचे बलबीर सिंह हेही घटनास्थळापासून काही अंतरावर होते. ते या घटनेत जखमी झाले आहेत. ते म्हणाले, मी माझ्या कारमध्ये बसलो होता. ट्रॅफिक जाम होते. तेव्हा अचानक जोरदार धमाका झाला. पाठोपाठ एक व्यक्ती हवेत उडाली आणि ती माझ्या कारवर येऊन आदळली. तिचा जागीच मृत्यू झाला. मी सुखरूप वाचलो. माझा भाऊ सामान खरेदी करण्यासाठी चांदणी चौकात गेला होता. त्याने लाल किल्ल्याजवळ बोलावले होते. परंतु, मी वेळेत पोहोचलो नाही; अन्यथा मी जिवंत नसतो.
आरडाओरडा आणि भीती
काही समजत नव्हते. प्रचंड आवाज आला. संपूर्ण परिसर धुरळ्याने भरून गेला. क्षणभर वाटले की, भरबाजारातच स्फोट झाला की काय. पाठोपाठ आरडाओरडा आणि जो तो पळत सुटत होता, असे पानिपतचे महेश यांनी सांगितले.
गाडीखाली जाऊन आपटलो
चंदूनगर यासीन हा रिक्षाचालक. तो म्हणाला, माझ्या रिक्षात तिघेजण होते. स्फोटाबरोबर आम्हीही उडालो. मी गाडीखाली जाऊन आदळलो. कान सुन्न झाले. शुद्धीत आलो आणि पाहिले तर माझ्या रिक्षातील प्रवासी कुठे दिसले नाहीत. यासीन काश्मिरी गेटजवळून तीन नेपाळी टुरिस्टना घेऊन नवी दिल्ली रेल्वे स्टेशनकडे जात होता. मी माझ्यासमोर तिघा-चौघांचे मृतदेह पाहिल्याचे तो सांगतो.