मॉस्को : रशियाच्या वैज्ञानिकांनी कर्करोगावरील लसीसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी तयार केलेली लस आता मानवावरील वापरासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. रशियन फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सी (FMBA) ने सांगितले की, ‘रशियन एंटरोमिक्स कॅन्सर व्हॅक्सिन’ आता क्लिनिकल वापरासाठी सज्ज आहे.
रशियन वृत्तसंस्था ‘स्पुतनिक’ने FMBA प्रमुख वेरोनिका स्क्वोर्तसोवा यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ही mRNA आधारित लस प्रीक्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत या लसीने आपली सुरक्षितता आणि उच्च परिणामकारकता सिद्ध केली आहे. स्क्वोर्तसोवा यांनी सांगितले की, रशियन लसीने ट्यूमरचा (गाठींचा) आकार कमी करण्यात आणि त्यांची वाढ थांबवण्यात प्रभावी परिणाम दाखवले आहेत. ट्यूमरचा आकार 60 ते 80 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. या लसीचा पुन्हा पुन्हा वापर करणे सुरक्षित असल्याचेही सिद्ध झाले आहे. याचा अर्थ, लस आता वापरासाठी पूर्णपणे तयार आहे.
त्यांनी असेही सांगितले की, प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक ठछअ नुसार ही लस तयार केली जाईल. स्क्वोर्तसोवा यांनी रशियन माध्यमांना सांगितले की, ‘हे संशोधन अनेक वर्षांपासून सुरू होते, ज्यात गेल्या तीन वर्षांत आवश्यक प्रीक्लिनिकल अभ्यास करण्यात आला. लस आता वापरासाठी तयार आहे आणि आम्ही फक्त अधिकृत मंजुरीची वाट पाहत आहोत. अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की, या लसीमुळे रुग्णांचे जगण्याचे प्रमाण वाढले आहे.
या वर्षी उन्हाळ्यातच FMBA ने आरोग्य मंत्रालयाकडे या लसीला मंजुरी देण्यासाठी अर्ज केला होता. RNA प्रमुखांनुसार, या लसीची पहिली आवृत्ती कोलोरेक्टल कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाईल. याव्यतिरिक्त, ग्लियोब्लास्टोमा (एक प्रकारचा मेंदूचा कर्करोग) आणि विशिष्ट प्रकारच्या मेलेनोमा (त्वचेचा कर्करोग) साठीही लस विकसित करण्याचे काम प्रगत टप्प्यात आहे.