लंडन : आर्क्टिक वर्तुळातील प्रदेशांमध्ये आकाशात 'ऑरोरा' किंवा 'नॉर्दर्न लाईटस्' दिसणे ही एक सर्वसामान्य बाब आहे. सौरकण ज्यावेळी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकतात त्यावेळी ध्रुवीय प्रदेशातील आकाशात असे रंगीबेरंगी प्रकाशाचे झोत निर्माण होत असतात. मात्र, आता आर्क्टिक वर्तुळाच्या आकाशात इंद्रधनुष्यी ढग (rainbow cloud) दिसून आले आहेत. हे रंगीबेरंगी ढग ऑरोराचा परिणाम नव्हते हे विशेष. वातावरणात उंच ठिकाणी तरंगत असलेल्या बर्फाच्या सूक्ष्म कणांमुळे हे रंगीबेरंगी ढग निर्माण झाले होते.
या ढगांना 'पोलर स्ट्रॅटोस्फिरिक क्लाऊडस्' (पीएससी) असे म्हटले जाते. ज्यावेळी वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फियर या स्तरातील तापमान उणे 81 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते त्यावेळी असे ढग निर्माण होतात. सर्वसामान्यपणे स्ट्रॅटोस्फियरचा भाग अत्यंत कोरडा असल्याने अशा ठिकाणी ढगांची निर्मिती होत नाही. मात्र, अत्यंत थंड वातावरणात तिथे पाण्याचे रेणू गोठून बर्फाचे सूक्ष्म स्फटिक तयार होतात व त्यांच्यापासून अशा ढगांची निर्मिती होते. आपण नेहमी जे ढग पाहतो त्यांच्यापेक्षा अधिक उंचीवर हे विशिष्ट ढग असतात. जमिनीपासून 15 ते 25 किलोमीटर उंचीवर हे ढग निर्माण होतात. या बर्फ कणांच्या ढगांमधून सूर्यकिरणे गेल्यावर ते विखुरले जाऊन हे रंग निर्माण होतात.
इंद्रधनुष्य निर्माण होत असताना पाण्याच्या थेंबामधून अशाच प्रकारे सूर्यकिरणे जात असतात. त्यामुळे या रंगीत ढगांनाही 'रेनबो क्लाऊडस्' असेच म्हटलेे जाते. आईसलँड, नॉर्वे आणि फिनलँडसारख्या आर्क्टिक वर्तुळातील देशांच्या आकाशात असे रंगीत ढग दिसू शकतात. आता आईसलँडमधील माऊंट जोकुलटिंडूरच्या आसमंतात तसेच नॉर्वेमधील ट्रोमसो येथेही असे ढग दिसून आले. ते छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेर्यात कैद करून घेतले.
हेही वाचा :