मधमाश्यांकडून संततीचे नैसर्गिकरीत्याच केले जाते रोगप्रतिकारक लसीकरण Pudhari Photo
विश्वसंचार

मधमाश्यांकडून संततीचे नैसर्गिकरीत्याच केले जाते रोगप्रतिकारक लसीकरण

मधमाश्यांच्या रक्तातील व्हिटेलोगेनिन या प्रथिनांवर संशोधन

करण शिंदे

वॉशिंग्टन : मधमाश्या आणि मुंग्या यांचे सामूहिक सहजीवन, त्यांची कष्टाळू वृत्ती, कौशल्य, नियोजन याचे नेहमीच माणसाला अप्रुप वाटत आलेले आहे. मधमाश्यांमध्ये अनेक गुण असतात. संशोधकांनी म्हटले आहे की मधमाश्या त्यांनी जन्माला घातलेल्या संततीचे लसीकरण नैसर्गिक पद्धतीने करीत असतात, त्यामुळे पर्यावरणातील बदलांमुळे होणार्‍या अनेक रोगांपासून त्यांचे संरक्षण होते. अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ हेलिसिंकी, युनिव्हर्सिटी ऑफ जव्यास्काला व नार्वेजियन युनिव्हसिर्र्टी ऑफ लाईफ सायन्सेस यांनी मधमाश्यांच्या रक्तातील व्हिटेलोगेनिन या प्रथिनांवर संशोधन केलेले आहे.

वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, हे प्रथिन महत्त्वाची भूमिका बजावते. मधमाश्यांच्या संततीचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका याआधी माहिती नव्हती. या मधमाश्या त्यांच्या संततीला हे प्रथिन देतात, पण ते कसे देतात हे माहिती नव्हते, असे एसएसयू स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसचे ग्रो अ‍ॅमडॅम यांनी सागितले. आमचा शोध हा वेगळा आहे, गेली पंधरा वर्षे आम्ही व्हिटेलोगेनिन या प्रथिनावर संशोधन करीत होतो, असे ‘प्लॉस पॅथोजेन्स’ या नियतकालिकाने म्हटले आहे. मधमाशांच्या वसाहतीत राणीमाशी पोळे सोडून जात नाही, कामकरी माशा तिच्यासाठी अन्न आणत असतात. अन्न संकलन करणार्‍या माशांना रोगजंतूंची बाधा होऊ शकते, कारण त्या परागकण गोळा करत असतात. पोळ्यात परत आल्यावर कामकरी माशा परागकणापासून रॉयल जेली तयार करतात; ते राणीमाशीचे अन्न असते. त्यात काहीवेळा जीवाणू असू शकतात.

जीवाणू सेवन केल्याने रोगजंतू आतड्यात पचवले जाऊन शरीरातील खोबणीत टाकले जातात. तेथे ते राणी माशीच्या यकृतासारख्या अवयवात राहतात. नंतर जीवाणूंचे तुकडे व्हिटेलोगेनिन या प्रथिनाशी जोडले जातात व नंतर रक्ताद्वारे अंडी तयार करण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे मधमाशीच्या संततीला आपोआप लसीकरण होते व त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. त्या रोगांचा सामना करू शकतात. व्हिटेलोगेनिन हे प्रथिन हे प्रतिकारशक्ती संदेशांचे वाहक असते. मधमाश्या त्यांच्या संततीचे लसीकरण करतात तरी काही रोगजंतू घातक असतात. आता संशोधकांना मधमाश्या लसीकरण कसे करतात हे समजले आहे, त्यामुळे कीटकांसाठी लशी तयार करता येणे शक्य आहे. हानी होणार नाही अशा लसी तयार करण्याचा हा मार्ग असून मधमाशा वाचवणे त्यातून शक्य आहे, असे हेलसिंकी विद्यापीठाचे डॅलियल फेटक यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT