काठमांडू : भारताचा शेजारील देश असलेल्या नेपाळच्या उंच पर्वतांमध्ये दडलेले 42 हिमनदी तलाव (ग्लेशियल लेक) आता अत्यंत धोकादायक श्रेणीत पोहोचले आहेत. हे विशाल तलाव कोणत्याही क्षणी फुटू शकतात आणि जर असे झाले, तर खाली असलेली संपूर्ण दरी काही मिनिटांतच विनाशकारी पूर आणि चिखलाच्या ढिगार्यात बदलू शकते, असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या धोक्याला वैज्ञानिक आता ‘टाईम बॉम्ब’ म्हणत आहेत.
इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटेन डेव्हलपमेंटच्या (आयसीआयएमओडी) अहवालानुसार, नेपाळमधील एकूण 2,069 हिमनदी तलावांपैकी धोक्याच्या यादीतील हे सर्व 42 तलाव कोसी प्रांतामध्ये आहेत. संखुवासभा जिल्ह्यातील लोअर बरुण परिसरातील तल्लोपोखरी हिमनदी तलाव सर्वात धोकादायक मानला जात आहे. हा तलाव सुमारे तीन किलोमीटर लांब आणि जवळपास 206 मीटर खोल आहे. संखुवासभा जिल्ह्यातील भोटखोला आणि मकालु या भागांमधील तलावांनाही जास्त धोका आहे.आयसीआयएमओडीने नेपाळच्या उत्तरेकडील भागांसाठी तिबेटमध्ये उगम पावलेल्या 13 हिमनदी तलावांचा संयुक्त धोका देखील गंभीर असल्याचे म्हटले आहे.
जर या हिमनदी तलावांपैकी एक जरी फुटला, तर खालच्या भागात असलेल्या अरुण नदीच्या खोर्यातील (अरुण व्हॅली) गावे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधा अक्षरशः वाहून जातील. या महापुरात (ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड : जीएलओएफ ) मालमत्तेच्या नुकसानी व्यतिरिक्त, वाहून गेलेल्या लोकांचे मृतदेह शोधणे देखील अशक्य होईल, इतका हा धोका विशाल आहे, असा इशारा आयसीआयएमओडीने दिला आहे. या संवेदनशील हिमनदी तलावांवर थोडासाही भूकंप, अतिवृष्टी किंवा हिमनदी तुटण्याचा (ग्लेशियर बे्रकिंग) परिणाम अत्यंत विनाशकारी ठरू शकतो. सध्या, जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभाग आणि यूएनडीपी नेपाळ यांच्या सहकार्याने या चार उच्च-धोका असलेल्या तलावांसाठी आपत्कालीन उपाययोजनांवर काम करत आहेत.