‘व्होएजर-2’चे उपकरण बंद करण्याचा निर्णय. Pudhari File Photo
विश्वसंचार

‘नासा’ने बंद केले ‘व्होएजर-2’चे उपकरण

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘नासा’चे ‘व्होएजर-2’ हे अंतराळ यान माणसाने बनवलेले आणि सर्वात दूरवर गेलेले उपकरण ठरलेले आहे. हे यान पृथ्वीपासून 20.9 अब्ज किलोमीटरवर गेले आहे. ‘नासा’च्या संशोधकांच्या मते, त्याची ऊर्जा सातत्याने कमी होत चालली आहे. त्यामुळे आता त्याचे एक विज्ञान उपकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मिशन इंजिनिअरनी ‘व्होएजर-2’च्या प्लाझ्मा सायन्स किंवा ‘पीएलएस एक्सपेरिमेंट’ बंक करण्यासाठी एक कमांड पाठवली. त्याचा वापर सौर वार्‍यांचे निरीक्षण करण्यासाठी केला जात होता.

डीप स्पेस नेटवर्कचा वापर करून बंद करण्यासाठी सिग्नल पाठवणार

26 सप्टेंबरला डीप स्पेस नेटवर्कचा वापर करून ते बंद करण्यासाठीचा सिग्नल पाठवण्यात आला. ‘डीएसएन’ ही विशाल रेडिओ अँटेनाची एक सीरिज आहे, जी अंतराळाच्या माध्यमातून अब्जावधी किलोमीटरपर्यंत माहिती पाठवू शकते. ‘नासा’ने म्हटले आहे की, ‘व्होएजर-2’ पर्यंत संदेश पोहोचण्यासाठी 19 तास लागले आणि परतीचा संदेश 19 तासांनी मिळाला. हे अंतराळ यान बरेच जुने असून, त्याचा ऊर्जा साठा सातत्याने कमी होऊ लागला आहे. मात्र, तरीही हे यान एका विज्ञान उपकरणासह 2030 च्या दशकापर्यंत काम करू शकेल, असे ‘नासा’च्या संशोधकांना वाटते. ‘नासा’ला गेल्या काही वर्षांच्या काळात या यानाची अनेक उपकरणे बंद करावी लागली आहेत. हे यान 47 वर्षांपूर्वीचे आहे. प्लुटोनियमने चालणारी बॅटरी यामध्ये असून, तिची क्षमता आता कमी होत चालली आहे. ‘व्होएजर-2’ मध्ये तीन रेडिओआयसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर आहेत, जे क्षयकारी प्लुटोनियमच्या उत्सर्जनाने निर्माण होणार्‍या उष्णतेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करते. तेच यानाच्या अन्य कॉम्प्युटरना किंवा उपकरणांना चालवण्यासाठी मदत करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT