कासवांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका Pudhari Photo
विश्वसंचार

कासवांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : कासवांना आपण दीर्घायुष्यी प्राणी मानतो. मात्र माणसाचा धोका अन्य प्रजातींप्रमाणेच कासवांनाही भेडसावत आहे. जगातील कासवांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही वर्षांपूर्वी ‘लॉन्सम जॉर्ज’ नावाच्या कासवाचा मृत्यू झाला. ‘पिंटा आयलंड जायंट’ प्रजातीतील तो अखेरचा कासव होता. पृथ्वीवर तो एकटाच उरल्याने एकांगी जीवन त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरले. 8 जुलै 2012 मध्ये तो मृत पावला आणि पृथ्वीवरूनच ही प्रजाती संपली. आता ‘जायंट सॉफ्ट शिल्ड टर्टल’ ही पृथ्वीवरील कासवांची दुर्मीळ प्रजाती ठरली आहे. जगातील मोठ्या गोड्या पाण्यातील हे कासव आता अवघे चारच उरले आहेत. दुर्मीळ होत चाललेल्या वन्यप्राण्यांचा अभ्यास करणार्‍या ‘इंडेन्जर्ड वाईल्डलाईफ ट्रस्ट’च्या अभ्यासातून हे वास्तव यापूर्वीच समोर आलेले आहे.

भारतात कासवांच्या सर्वाधिक प्रजाती असून त्यातील अनेक दुर्मीळ होत असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खाण्यासाठी, फेंगशुई, जादूटोणा आदींसाठी शिकार आणि त्याचा व्यवहार लाखो आणि कोटी रुपयांच्या घरात होतो. हजारो कासव त्यांच्या निवासस्थानातून पकडून आणली जातात आणि परदेशात पाळीव प्राणी म्हणून विकली जातात. वास्तविक, कासवांच्या सर्वच प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार संरक्षित असल्यामुळे त्यांना खाणे, पकडणे, विकणे, विकत घेणे आणि पोसणे बेकायदेशीर आहे. तरीही बेकायदेशीररीत्या त्यांचा व्यवहार होतो. उत्तर भारतात कासवांच्या मांसाहाराला अनन्यसाधारण महत्त्व असून त्या ठिकाणी कासवाचे मटण कोंबडीच्या दरात विकले जाते मात्र; कासव खाणे हे मनुष्यासाठी हानिकारक ठरू शकते. प्राणी प्रदूषण आणि निवासस्थाने संपुष्टात आल्यामुळेसुद्धा कासवांची संख्या कमी होत आहे.

निसर्गसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कासव नाहीसे झाल्यास त्याचे अनिष्ट परिणाम पृथ्वीवर होऊ शकतात. बीज प्रसार, इतर प्रजातींच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, मेलेल्या, कुजलेल्या प्राण्यांना व वनस्पतीला खाऊन निसर्ग स्वच्छ ठेवणे यामुळे शेकडो प्रजातीसाठी आवश्यक असलेली निवासस्थाने तयार होतात. त्यामुळे कासवांचे संरक्षण व संवर्धन अत्यावश्यक आहे. कासव हा प्राणी बकरी, कोंबडी, मासोळ्या, रानडुक्कर या प्राण्यांसारखे प्रजनन करत नाही. त्यांना लैंगिकद़ृष्ट्या परिपक्व होण्यासाठी 10 ते 30 वर्षे लागतात. त्यामुळे पूर्ण वाढीचा एक कासव खाल्ला तरी त्याची जागा निसर्गात भरून निघण्यास किमान 15 वर्षांचा कालावधी लागतो. कासवांच्या खाण्याचे प्रमाण जेवढे अधिक आहे, त्या तुलनेत कासवांच्या प्रजननाची गती अतिशय कमी आहे. 250 लाख वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असणार्‍या हजारो प्रजातींचे कासव नष्ट होण्यासाठी माणूसच कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT