'ही' आहे देशातील सर्वात शाही रेल्वे , तिकिटाचा दर ऐकूनच तुम्हाला घाम फुटेल  
विश्वसंचार

India luxury train : 'ही' आहे देशातील सर्वात शाही रेल्वे , तिकिटाचा दर ऐकूनच तुम्हाला घाम फुटेल

'या' तिकिटातून सात दिवस आणि सहा रात्रींसाठी करता येतो प्रवास

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः ‘झुक झुक गाडी’चे आकर्षण आपल्याला लहान वयापासूनच असते. मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकल रेल्वे ही ‘लाईफलाईन’च बनलेली आहे. सध्या देशभरात मेट्रोचे जाळेही विस्तारले आहे. अनेक रेल्वे लोकांना कमी खर्चात लांबचा प्रवास करण्याची सुविधा देतात; मात्र आपल्या देशात काही खास व शाही रेल्वेही आहेत. देशात अशी एक रेल्वे आहे, जिने प्रवास करायचा असेल तर तिकिटासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. या रेल्वेचे नाव ‘महाराजा एक्स्प्रेस’ असे आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या शाही रेल्वेतून प्रवास केलेला आहे. महाराजा एक्स्प्रेस या रेल्वेतून प्रवास करायचा असेल तर 6.9 लाख ते 22.2 लाख रुपये तिकीट असते. या तिकिटातून सात दिवस आणि सहा रात्रींसाठी या रेल्वेतून प्रवास करता येतो.

या काळात तुम्हाला एखाद्या राजासारखी वागणूक दिली जाते. तसेच या प्रवासात तुम्हाला डायनिंग रेस्टॉरंटस् असतात. तसेच टायगर रिझर्व्ह आणि किल्ले पाहायला मिळतात. मुबलक प्रमाणात पैसे असणार्‍या पर्यटकांसाठी ही रेल्वे आहे. अनेक परदेशी पर्यटक या रेल्वेप्रवासाचा आनंद घेत असतात. या रेल्वेतून तुम्ही जोपर्यंत प्रवास करता तोपर्यंत तुम्हाला शाही वागणूक दिली जाते. या रेल्वेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा मिळतात. ‘महाराजा एक्स्प्रेस’ या रेल्वेत ‘नवरत्न’ हा भाग सर्वाधिक आकर्षक आहे. यात एक लिव्हिंग रूम आहे. दोन बेडरूम दिले जातात. तसेच एक प्रायव्हेट बाथरूमही असते. या नवरत्न सूटला प्रेसिडेंशियल सुट असे म्हटले जाते. हा भाग एक चालता-फिरता महालच आहे. या रेल्वेत एकूण 18 डबे आहेत. यात लक्झरी केबिन आहे, डायनिंग कार, लाऊंज, सिक्योरिटी, स्टाफला राहण्यासाठीची खोली अशा सगळ्यांचा समावेश आहे. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी या रेल्वेत एक मेडिकल कोचदेखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT