संशोधकांनी अशा वायूंचा एक समूह शोधला आहे जाे परग्रहावरील जीवसृष्टीचा छडा लावू शकताे. Pudhari File Photo
विश्वसंचार

‘ग्रीन हाऊस गॅस’च्या समूहाने लागेल परग्रहावरील जीवसृष्टीचा छडा

ग्रीन हाऊस गॅस समूह शोधणार परग्रहावरील जीवसृष्टीचा रहस्य

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ म्हणजे असे वायू जे पृथ्वीभोवती एखाद्या ग्रीनहाऊसप्रमाणे कवच बनवतात आणि त्यामुळे पृथ्वीवर सूर्याची उष्णता कोंडून तापमानात वाढ होते. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडसारखे अनेक वायू या ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ मध्ये मोडतात. आता संशोधकांनी अशा वायूंचा एक समूह शोधला आहे जो सध्या तरी केवळ पृथ्वीवरच आढळतो. हा समूहच अन्य ग्रहावरील जीवसृष्टीला शोधण्यासाठी मदत करू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. एखाद्या ग्रहाच्या वातावरणात असे वायू असतील, तर तिथे जीवसृष्टी असू शकते. याचे कारण म्हणजे हे वायू अंतराळात आढळू शकत नाहीत.

संशोधक एडवर्ड श्विटरमॅन यांनी दिली याबाबतची माहिती

ग्रीनहाऊस वायूंचा हा समूह परग्रहावरील जीवसृष्टीसाठी एक मार्करच्या रूपाने वापरला जाऊ शकतो. असे वायू पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंगचे कारण बनत असल्याने त्यांचे उत्सर्जन किंवा त्यांच्या स्तरातील वाढ रोखणे अपरिहार्य ठरते. मात्र, हेच वायू अन्य ग्रहांवरील जीवसृष्टीचे संकेत देऊ शकतात. कॉलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधक एडवर्ड श्विटरमॅन यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले आपल्यासाठी हे वायू हानीकारक आहेत. कारण, आपल्याला पृथ्वीचे तापमान वाढवायचे नाही. मात्र, एखाद्या ग्रहावर जर हिमयुग असेल, तर ते रोखण्यासाठी त्यांना अशा वायूंची गरज आहे. एखाद्या निर्जन व बर्फाळ ग्रहाला ऊबदार करण्यासाठीही असे वायू गरजेचे ठरतात.

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने अशा वायूंचा लावू शकताे छडा

‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने अंतराळात अशा वायूंचा छडा लावता येऊ शकतो. आपल्या सौरमंडळाच्या बाहेरील एखाद्या ग्रहाच्या वातावरणात असे वायू कमी प्रमाणात जरी असले, तरी त्यांचा छडा लावता येईल. असे वायू जिथे आढळतील तिथे जीवसृष्टीची शक्यता असू शकते. याचे कारण म्हणजे ते नैसर्गिक स्रोतामधून येत असतात. त्यांचे अस्तित्व जीवनाचे संकेत देऊ शकते. या वायूंमध्ये नायट्रोजन, फ्लोरिन किंवा सल्फर व फ्लोरिनपासून बनलेल्या वायूंबरोबरच मिथेन, ईथेन आणि प्रोपेनचे फ्लोराईडयुक्त रूप समाविष्ट आहे. पृथ्वीवर त्यांचा वापर कॉम्प्युटर चिप बनविण्यासारख्या उद्योगांमध्ये होतो. या वायूंचा एक उपसमूह सल्फर हेक्साफ्लोराईड आहे, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईडपेक्षा 23,500 पट अधिक उष्ण करण्याची क्षमता आहे. या वायूचे कमी प्रमाणही जर अस्तित्वात असेल, तर एखाद्या ग्रहाचे तापमान इतके वाढू शकते की, त्याच्या पृष्ठभागावरील बर्फ द्रवरूप पाण्यात रूपांतरित होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT