न्यूयॉर्क : बेडूक आणि इतर उभयचर प्राणी श्वास घेण्यासाठी केवळ फुफ्फुसांवर अवलंबून नसतात. त्यांच्या त्वचेत एक खास रचना असते, ज्यामुळे ते ऑक्सिजन आणि पाण्याची देवाणघेवाण करू शकतात. बेडकाची त्वचा अत्यंत गुंतागुंतीची असते: ती पातळ असते, त्वचेला ओलसर ठेवण्यासाठी श्लेष्म निर्माण करणार्या ग्रंथींनी झाकलेली असते आणि हवेचे रेणू आत शिरू शकतील इतकी सच्छिद्र असते.
न्यूयॉर्कमधील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे क्युरेटर आणि हर्पेटोलॉजिस्ट क्रिस्टोफर रॅक्सवर्थी यांनी सांगितले, ‘ऑक्सिजन आत जाण्यास आणि पाणी शोषले जाण्यास मदत होईल अशा पद्धतीने त्यांची त्वचा तयार केलेली असते.’ कनेक्टिकट विद्यापीठातील उत्क्रांती जीवशास्त्रज्ञ कर्ट श्वेंक यांच्या स्पष्टीकरणानुसार, त्वचेच्या अगदी खाली असलेल्या लहान रक्तवाहिन्यांचे जाळे थेट पाणी किंवा हवेतून ऑक्सिजन शोषून घेते आणि कार्बन डाय ऑक्साईड शरीराबाहेर टाकण्यास मदत करते. या प्रक्रियेला ‘त्वचेद्वारे श्वसन’ म्हणतात.
रॅक्सवर्थी यांनी याबद्दल अधिक स्पष्ट करताना सांगितले की, ‘ही खर्या अर्थाने फुफ्फुसांच्या प्रणालीसारखीच आहे.’ बेडूक फुफ्फुसे आणि तोंडाच्या आतील आवरणातूनही श्वास घेऊ शकतात; परंतु त्वचेद्वारे श्वसनामुळे ते पाण्याखाली आणि दीर्घकाळच्या शीतनिद्रेमध्ये जगू शकतात. श्वेंक म्हणतात, ‘जवळपास कोणताही प्रयत्न न करता, त्यांची त्वचा फक्त ओलसर ठेवल्यास आणि त्यात काही रक्तवाहिन्या असल्यामुळे, त्यांना आवडले किंवा न आवडले तरी त्यांच्या त्वचेतून वायू आणि पाण्याची देवाणघेवाण होत राहते.’ तथापि, सर्व बेडूक त्वचेद्वारे श्वसनावर समान प्रमाणात अवलंबून नसतात.
दुसरीकडे, बेडकाच्या पिल्लांमध्ये गिल विकसित झालेले नसतात, त्यामुळे त्यांना जगण्यासाठी पृष्ठभागावरून हवा श्वासामध्ये घ्यावी लागते. परंतु, नुकतेच अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले पाण्याच्या पृष्ठभागावरील ताण तोडून हवा घेण्यासाठी खूप लहान असतात. त्याऐवजी, ती स्वतःचे हवेचे बुडबुडे तयार करतात. 2020 च्या एका अभ्यासात, श्वेंक आणि त्यांच्या सहकार्यांनी निरीक्षण केले की बेडकाची पिल्ले पृष्ठभागाच्या अगदी खाली पोहतात, जिथे ते झपाट्याने हवा आत शोषून एक बुडबुडा तयार करतात. त्यानंतर, ते हा हवेचा बुडबुडा त्यांच्या फुफ्फुसात ढकलतात.