न्यूयॉर्क :
लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीला एका लघुग्रहाची धडक होऊन, डायनासोर व अनेक जीवांच्या प्रजाती नष्ट झाल्या. आता त्या दिवसाचा साक्षीदार असलेल्या एका ठिकाणाचा संशोधकांनी शोध घेतला आहे. त्यांनी तब्बल 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी जणू काही दफनभूमीच बनलेले एक असे ठिकाण शोधले आहे, जिथे मासे, सस्तन प्राणी आणि मोठे डायनासोरही लघुग्रहाच्या धडकेनंतर आलेल्या त्सुनामीवेळी दफन झाले. लघुग्रहाच्या धडकेनंतर पृथ्वीवरील 75 टक्के जीव नष्ट झाले होते. अमेरिकेतील नॉर्थ डकोटा येथे 'टॅनिस' नावाचे हे ठिकाण असून, आता प्रागैतिहासिक काळातील त्या घटनेवेळी नेमके काय घडले होते, हे जाणून घेण्यासाठी त्याची मदत होऊ शकते.
66 दशलक्ष वर्षांपूर्वी 'चिक्सलब' लघुग्रहाची पृथ्वीला धडक झाली. मेक्सिकोमधील चिक्सलब या ठिकाणी लघुग्रहाच्या धडकेने एक विवर तयार झाले असल्याने या शहराचेच नाव लघुग्रहाला दिले आहे. या धडकेनंतर त्सुनामीच्या लाटा उसळल्या आणि अनेक मासे, सस्तन प्राणी, सरिसृप व मोठे डायनासोरही वाहून या ठिकाणी दफन झाले. त्या काळातील ही पहिलीच अनेक जीवांची 'सामूहिक दफनभूमी' सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. सहा कोटी वर्षांपूर्वी नॉर्थ डकोटाच्या या भागात अक्षरशः प्रलय आला होता. दहा ते अकरा भूकंपाने पृथ्वी जितकी हादरेल, तितकाच धक्का त्यावेळी बसला होता आणि सर्वत्र ही कंपने पसरली होती. ताशी 200 मैल वेगाने येणार्या छोट्या आकाराच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसारखा मारा आकाशातून झाला. त्यावेळी उसळलेल्या त्सुनामी लाटांनी नद्यांचा प्रवाहही उलटा केला. त्या काळाचे साक्षीदार असलेल्या टॅनिस या ठिकाणी गेल्या सहा वर्षांपासून उत्खनन सुरू होते. इथे क्रेटासिअस काळातील त्या भीषण घटनेचे पुरावे लपलेले आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी जीवाश्मभूत मासे, सस्तन प्राणी, किटक, सागरी सरिसृप तसेच ट्रायसेराटॉप्स प्रजातीचे डायनासोरही एकमेकांवरील स्तरात आढळून आले आहेत. हे ठिकाण इरिडियमने संपन्न आहे, हे विशेष. हे खनिज पृथ्वीवर दुर्मीळ असले तरी लघुग्रह आणि धुमकेतूंमध्ये अधिक प्रमाणात असते. फ्लोरिडातील पाम बीच म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी आणि कन्सास युनिव्हर्सिटीचे संशोधक याबाबतचे संशोधन करीत आहेत.