सकाळी प्रत्येकाची दिनचर्या ही वेगवेगळी असते. अनेकजण हलका नाश्ता घेऊन दिवसाची सुरुवात करतात, तर काहीजण चहाने दिवसाची सुरुवात करतात. काहींना कॉफी आवडते, तर काहीजण फळांनी दिवसाची सुरुवात करतात. पण असे काही पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी कधीच खाऊ नयेत, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
या पदार्थांच्या रिकाम्या पोटी सेवनाने पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामध्ये आम्लता, पोटफुगी आणि ऊर्जा कमी होणे यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यानंतर लगेच खाल्लेले काही पदार्थ पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात आणि दिवसभर त्याचा परिणाम तुमच्या उर्जेच्या पातळीवर होतो. चला जाणून घेऊया की, असे कोणते तीन पदार्थ आहेत जे सकाळी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नयेत....
आंबट फळे : सकाळी उठल्यानंतर आंबट फळे खाणे टाळावे. जसे की, संत्री आणि लिंबू. लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन ‘सी’ने समृद्ध आणि आरोग्यदायी असतात; परंतु रिकाम्या पोटी ती खाणे योग्य नाही. अशी फळे जास्त आम्लयुक्त असल्याने पोटाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ आणि गॅस होऊ शकतो. ज्यांना आधीच पोट किंवा आम्लपित्त समस्या आहेत, त्यांनी सकाळी ही फळे टाळावीत.
ब्लॅक कॉफी : अनेकांना दिवसाची सुरुवात ब्लॅक कॉफीने करायला आवडते. सकाळी ऊर्जा वाढवण्यासाठी अनेकांना कॉफी आवडते; परंतु रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे ॲसिड निर्माण करू शकते. ब्लॅक कॉफी अचानक पोटातील ॲसिड वाढवते, ज्यामुळे केवळ छातीत जळजळच नाही तर पोट फुगणे, अस्वस्थता आणि ऊर्जा कमी होते. शिवाय, कॉफीमध्ये कॅफिन असते, जे शरीरात कॉर्टिसोल, स्ट्रेस हार्मोन वाढवते, जे शरीराचे नैसर्गिक ऊर्जा संतुलन बिघडू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कधीही ब्लॅक कॉफी घेऊ नये.
जड, तळलेले पदार्थ : सकाळी जड, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर अनावश्यक ताण पडतो. यामुळे गॅस, अपचन आणि दिवसभर जडपणा जाणवू शकतो. तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि मसाल्यांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटफुगी आणि आम्लता वाढू शकते. त्यामुळे सकाळी कामात सुस्तपणा आणि थकवा देखील निर्माण करतात.