पुढारी वृत्तसेवा
नुकताच ‘जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ साजरा झाला.
संशोधनातून मानसिक आरोग्याच्या समस्या सर्व वयोगटातील लोकांवर गंभीर परिणाम करत असल्याचे दिसून आले आहे.
पुरुष असो वा महिला, सगळेच याचा शिकार होत आहेत.
आपण अनेकदा ऐकतो की, पुरुष रडत नाहीत, पुरुषाला वेदना होत नाही.
पण या सामाजिक विचारांनी कितीतरी पुरुषांचे मानसिक आरोग्य बिघडवले आहे, याचा कधी विचार केला आहे का?
भारतात पुरुषांचे मानसिक आरोग्य एक गंभीर समस्या बनली आहे.
याबद्दल आरोग्यतज्ज्ञ अनेक अहवालांमध्ये चिंता व्यक्त करत आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोच्या आकडेवारीनुसार, भारतात आत्महत्या करणार्या लोकांमध्ये सुमारे 70 टक्के पुरुष आहेत.
हा आकडा स्पष्टपणे दर्शवतो की, पुरुष मानसिकरीत्या किती दबावाखाली आहेत.
कामाचा ताण, कुटुंबाची जबाबदारी आणि आपल्या समस्यांबद्दल बोलण्यास समाजाने दिलेला नकार यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.