dinosaurs ancestors of birds
पक्ष्यांचे पूर्वज डायनासोर होते File Photo
विश्वसंचार

पक्ष्यांचे पूर्वज डायनासोर होते; मग ते उष्ण रक्ताचे कसे?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आधुनिक पक्ष्यांचा विकास हा डायनासोरपासून, विशेषतः उडू शकणार्‍या डायनासोरपासून झाला असे मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, डायनासोर हे सरीसृप वर्गात येतात. डायनासोर हे मोठ्या आकाराचे सरडे होते. मात्र, सध्याचा काळ विचारात घेतला तर सरड्यांपेक्षा पक्ष्यांची शारीरिक वैशिष्ट्ये वेगळी आहेत. पक्षी हे सस्तन प्राण्यांप्रमाणेच उष्ण रक्ताचे असतात. जर पक्ष्यांची उत्पत्ती डायनासोरपासून झाली तर ते सरड्यांप्रमाणे थंड रक्ताचे नसून उष्ण रक्ताचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. याचे उत्तर संशोधकांनी दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पक्षी हे तांत्रिकद़ृष्ट्या डायनासोरच आहेत, जे 66 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या त्या महाविनाशातून बचावले. मात्र, ते सध्याच्या काळातील बहुतांश सरीसृपांप्रमाणे थंड रक्ताचे नाहीत. याचे स्पष्ट कारण हेच आहे की, बहुतांश डायनासोर हे उष्ण रक्ताचेच होते!

पक्ष्यांची उत्पत्ती डायनासोरपासून झाली

पक्ष्यांची उत्पत्ती ही दोन पायांच्या ‘थेरोपॉड्स’ नावाच्या डायनासोरपासून झाली. याच कुळात महाकाय मांसाहारी डायनासोर प्रजाती ‘टी-रेक्स’चा तसेच तीन फूट लांबीच्या लहान ‘मोनोनायकस’चाही समावेश होतो. सस्तन प्राण्यांप्रमाणे पक्षीही उष्ण रक्ताचे किंवा एंडोथर्मिक म्हणजेच स्वतःच अंतर्गत यंत्रणेने शरीराचे तापमान नियंत्रित करणारे जीव आहेत. एंडोथर्मिक प्राण्यांमधील चयापचय क्रिया वेगवान असते. त्यामुळे ते अधिक क्रिया करू शकतात जसे की आकाशात उडणे. मात्र, त्यांना यासाठी अधिक कॅलरीजची आवश्यकता असते.

सस्तन प्राण्यांच्या तुलनेत चयापचय क्रियेचा वेग अधिक

ओक्लाहामा स्टेट युनिव्हर्सिटीतील अ‍ॅनाटोमी अँड पॅलिओंटोलॉजीचे प्राध्यापक हॉली वूडवर्ड यांनी सांगितले की, जे प्राणी उष्ण रक्ताचे असतात ते सहसा अधिक सक्रिय असतात. ते रात्रीही सक्रिय राहू शकतात. त्यामुळे त्यांना अन्न मिळवण्यात इतरांसारखी अडचण येत नाही. पक्ष्यांमध्ये त्यांच्याइतक्याच आकाराच्या सस्तन प्राण्यांच्या तुलनेत चयापचय क्रियेचा वेग अधिक असतो. ते आपल्या शरीराचे तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस म्हणजेच 106 ते 109 अंश फॅरेनहाईटदरम्यान ठेवतात.

प्राचीन काळातील पक्षीही उष्ण रक्ताचेच होते

हमिंगबर्ड हे चिमुकले पक्षी मिनिटाला 720 ते 5400 वेळा आपले पंख हलवतात. त्यांना त्यासाठीची ऊर्जा मिळवण्यासाठी दर दहा ते पंधरा मिनिटांनी खायला हवे असते. याउलट थंड रक्ताचे प्राणी किंवा एक्टोथर्म्स असतात ज्यामध्ये आधुनिक सरीसृप व माशांचा समावेश होतो. ते आपल्या शरीराचे तापमान बदलण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतात. त्यांना स्वतःचे तापमान वाढवण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागत नाही. त्यामुळे त्यांना सतत खावेही लागत नाही. उदा. मगरी एक वर्षापेक्षाही अधिक काळ अन्नाशिवाय जगू शकतात. प्राचीन काळातील पक्षीही उष्ण रक्ताचेच होते असे आढळलेले आहे.

SCROLL FOR NEXT