नवी दिल्ली : हिंदी महासागरात शार्क आणि शंकुश (रे) माशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. एका पाहणीनुसार हिंदी महासागराच्या क्षेत्रात 1970 नंतर या दोन प्रजातींच्या माशांच्या संख्येत तब्बल 84.7 टक्क्यांनी घट झालेली आहे.
कॅनडाच्या सिमोन फ्रासेर युनिव्हर्सिटी, बि—टनच्या एक्सेटेर युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियाच्या जेम्स कुक युनिव्हर्सिटी तसेच चार्ल्स डार्विन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी अन्यही जगभरातील काही संशोधकांच्या साथीने याबाबतचे संशोधन केले आहे.
गेल्या सुमारे 50 वर्षांच्या काळात जगभरातील शार्क आणि शंकुश (रे) माशांच्या संख्येत 71 टक्क्यांची घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम सागरी पर्यावरणावर पडत आहे. शार्क आणि शंकुश (रे) माशांच्या 31 पैकी 24 प्रजाती आता संकटग्रस्त प्रजातींच्या सूचीत आल्या आहेत. समुद्रातील ओसेनिक वाइटटीप आणि ग्रेट हॅमरहेड शार्कवरील संकटही वाढत चालले आहे. बेसुमार मासेमारी हे याचे एक प्रमुख कारण आहे.