विश्वसंचार

गिफ्ट कुपनच्या नादात केस कापण्यासाठी मोजले हजारो रुपये!

Arun Patil

बीजिंग : चिन्यांच्या अजब देशातील हे लेटेस्ट अजब! तिथे एक तरुण केवळ 230 रुपयांचा हेअरकट करण्यासाठी गेला होता. त्याला इतक्या रकमेचे एक गिफ्ट कुपन (Gift Coupons) मिळाले होते. त्या नादात त्याला सलूनने हजारो रुपयांचा गंडा घातला!

चीनमधील जेंगजियांग प्रांतामधील हांग्जो शहरात हा प्रकार घडला. (Gift Coupons) ली नावाच्या तरुणाबाबत हा प्रकार घडला. ली एका रेस्टॉरंटमध्ये हा वेटरचे काम करत होता. एका मित्राने या मुलाला हेअरकटसाठी 20 युआन म्हणजेच 230 रुपयांचे गिफ्ट कुपन दिले. या कुपनचा वापर करून 'बीजिक्सिंग' नावाच्या सलूनमध्ये हेअरकट करता येईल, असे या मुलाला सांगण्यात आले. मात्र, हेअरकट करण्यासाठी तो सलूनमध्ये गेला तेव्हा हेअरकट आधी त्याला हेअर मसाज आणि इतर सेवा घ्याव्या लागतील, असे सांगण्यात आले.

या मुलाला हेअर मसाज दिल्यानंतर त्याला फेसपॅकही लावण्यात आले. यानंतर या मुलाला सलूनमधून 5 हजार युआन (58 हजार रुपयांचे) गिफ्ट कुपन घेण्यास सांगण्यात आले. हे गिफ्ट कुपन घेतले तर अधिक सूट मिळेल, असे आमिष या तरुणाल दाखवण्यात आले. केस कापण्यासाठी चष्मा लावला नसल्याने या तरुणाला रेट कार्ड दिसत नव्हते. त्याने केवळ ऐकलेल्या गोष्टींना होकार दिला.

लीने होकार दिल्यानंतर केस कापणार्‍याने त्याच्या केसांना वेगवेगळ्या क्रीम आणि तेल लावले. त्यानंतर केस कापून झाल्यावर या तरुणाच्या हातात देण्यात आलेले बिल पाहिल्यानंतर या तरुणाला धक्का बसला. या बिलाच्या आकड्याने हजारो रुपयांचा टप्पा ओलांडला होता. या मुलाने आपल्याकडे केवळ 20 युआनचे कुपन असल्याचे सांगितल्यानंतर सलूनवाल्याचा आणि त्याचा वाद झाला. अखेर या मुलाला दमदाटी करून त्याच्या मोबाईलवरून सलूनमधील कर्मचार्‍यांनी क्रेडिट अ‍ॅप डाऊनलोड केले आणि 57 हजार रुपयांचे बिल वसूल केले. आता हे 57 हजारांचे कर्ज या मुलाला फेडावे लागणार आहे. या प्रकरणानंतर हे सलून स्थानिक प्रशासनाने बंद केले असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

-हेही वाचा 

SCROLL FOR NEXT