नवी दिल्ली : काळे आणि पांढरे चिया सीडस् आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. या लहान बियांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात. बरेच लोक ते पाण्यात किंवा दुधात टाकून खातात. चिया सीडस्मध्ये फायबर, प्रथिने, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, अँटिऑक्सिडेंटस्, तांबे, लोह, मॅग्नेेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी सुद्धा लोक हे खातात. पण, ते रोज खाणे योग्य आहे का आणि ते रात्री खाल्ले जाऊ शकतात का असे काही प्रश्न लोकांच्या मनात असतात. तुम्हालासुद्धा हे प्रश्ल असतील, तर त्याचे उत्तर येथे जाणून घ्या.
चिया सीडस् अधिक पौष्टिक असतात, ते खाल्ल्याने आरोग्यास बरेच फायदे मिळतात. तथापि, जास्त खाल्ल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. अशा वेळी दररोज केवळ 28 ग्रॅम सीडस् खाणे पुरेसे आहे. विशेषत: जर तुम्ही या सीडस् खाण्यास सुरुवात करत असाल, तर हळूहळू त्याचे सेवन वाढवता येऊ शकते. चिया सीडस् पाण्यात किंवा दुधात भिजवण्यास केवळ 20 मिनिटे लागतात. भिजल्यानंतर सीडस् जेलीसारख्या स्वरूपात येतात. मग ते तुम्ही तुमच्या आवडत्या पेय किंवा पाण्यात मिक्स करून पिऊ शकता. सकाळी चिया सीडस् खाणे चांगले मानले जाते. विशेषत: रिकाम्या पोटी खाण्याची ही उत्तम वेळ मानली जाते. कारण, ते चयापचय वाढवतात आणि दिवसाच्या प्रत्येक जेवणाचे पचन करण्यास मदत करतात. तथापि, काही अहवाल असे म्हणतात की, रात्री ते खाल्ल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.