मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी मत्स्याहार लाभदायक ठरतो. File Photo
विश्वसंचार

मेंदूच्या आरोग्यासाठी ‘हे’ मासे गुणकारी

पुढारी वृत्तसेवा

मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी मत्स्याहार लाभदायक ठरतो, असे संशोधक सांगतात. त्यामध्येही विशेषतः फॅटी फिश म्हणजेच चरबीयुक्त मासे अधिक गुणकारी असतात. अशा मत्स्याहारात ‘ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड’चा चांगला लाभ मिळतो. हा घटक मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. काही मासे यासाठी अतिशय लाभदायक ठरत असतात. आठवड्यातून दोन वेळा अशा माशांचे सेवन केल्यावर मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात. या माशांची ही माहिती...

हेरिंग :

या माशाला मराठीत भिंग, पाला तसेच दवाक मासा अशी नावे आहेत. हेरिंग हा लहान, तेलकट माशांचा एक प्रकार असून तो जगभरातील महासागरांमध्ये आढळतो. या माशामध्ये पार्‍याचे प्रमाण कमी असते. त्यामध्ये ‘ओमेगा-3’ फॅटी अ‍ॅसिड ईपीए आणि डीएचएचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नव्या गोष्टी शिकण्याची तसेच स्मरणशक्तीची क्षमता वाढते. डिमेंशियासारख्या मेंदूच्या आजाराला दूर ठेवण्यासाठी या माशाचे सेवन गुणकारी ठरते.

मॅकेरल :

या माशाला मराठीत ‘बांगडा मासा’ म्हणतात. हा हेरिंगप्रमाणेच छोट्या आकाराचा मासा असतो ज्यामध्ये ‘ओमेगा-3’ ईपीए आणि डीएचएचे प्रमाण अधिक असते. 100 ग्रॅम मॅकरेलमध्ये 898 ईपीए आणि 1400 डीएचए असतो. त्यामुळे मेंदूच्या सर्व भागांना आपले काम चांगले करण्यासाठीची क्षमता मिळते.

सॅमन :

मराठीत या माशाला ‘रावस’ असे म्हणतात. हा मासा ‘ओमेगा-3’ फॅटी अ‍ॅसिडसह ‘ड’ जीवनसत्व तसेच ‘ई’ व अनेक प्रकारच्या ‘बी’ जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे. या माशाच्या सेवनाने मेंदूला अतिशय लाभ मिळतोच, पण अनेक प्रकारचे आजार दूर ठेवण्यासाठीही मदत मिळते.

सार्डिन :

या माशाला मराठीत ‘तारली’ मासा म्हटले जाते. हा एक छोटा मासा असतो ज्यामध्ये ‘ओमेगा-3’ फॅटी अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असते. हा मासा स्वस्तही असल्याने मेंदूच्या आरोग्याला चालना देण्यासाठी हा एक किफायतशीर मार्ग मानला जातो. सार्डिनमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी घटक, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मेंदूबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही त्याचा लाभ होतो.

टुना :

या माशाला मराठीत ‘कुपा’ असे म्हणतात. हा एक लोकप्रिय मासा आहे ज्यामध्ये ‘ओमेगा-3’ फॅटी अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. काही टुना माशांमध्ये पार्‍याचा स्तर अधिक असू शकतो. त्यामुळे अल्बाकोर टुनासारख्या कमी पार्‍याच्या माशांची निवड करणे लाभदायक ठरू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT