लंडन : आपल्यापैकी अनेकजण सकाळी अलार्म वाजताच घाबरून जागे होतात. झोप मोडताच हृदय जोरजोरात धडधडू लागते, श्वासोच्छ्वास जलद होतो आणि काही क्षण शरीर दचकल्यासारखे होते. तुम्हाला वाटत असेल की, ही रोजची गोष्ट आहे; पण विज्ञानानुसार हा ‘मॉर्निंग शॉक’ आपल्या हृदयावर खरा ताण टाकतो. विशेषत:, ज्यांना आधीपासून हृदय किंवा रक्तदाबाची समस्या आहे.
आपल्या शरीरात 24 तासांची सर्केडियन रिदम (शरीराचे अंतर्गत घड्याळ) असते. हे घड्याळ झोप, हार्मोन्स, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके यावर नियंत्रण ठेवते. सकाळी 6 ते 10 दरम्यान शरीर आपोआप काही बदल करते. या काळात रक्तदाब वेगाने वाढतो, हृदयाचे ठोके जलद होतात आणि स्ट्रेस हार्मोन (अॅड्रेनालिन) वाढते. शरीर ‘फाईट-ऑर-फ्लाईट’ मोडमध्ये (संकटाचा सामना करण्यासाठी तयार) येते. म्हणजेच सकाळी तुमचे हृदय आधीच ‘हाय-अलर्ट’ मोडवर असते. अशा परिस्थितीत, जर अलार्म अचानक मोठ्या आवाजात वाजला, तर हृदयाला दुहेरी धक्का बसतो.
‘जेएएमए’ नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मोठ्या आवाजाचा धक्का लागताच शरीर काही सेकंदांत पुढील प्रतिक्रिया देते: रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब त्वरित वाढतो. रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त जोर लावावा लागतो. काही लोकांमध्ये यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यात थोडा वेळ कमी पडू शकतो. याला ‘सायलेंट इस्केमिया’ म्हणतात आणि यात बहुतांश लोकांना कोणतीही वेदना जाणवत नाही. ‘मॉर्निंग शॉक’ टाळण्यासाठी सॉफ्ट (हळुवार) अलार्म वापरा, गोड धून निवडा, जी हळूहळू वाढत जाते किंवा निसर्गाचे शांत आवाज वापरा. ‘सनराईज अलार्म’ हळूहळू खोलीतील प्रकाश वाढवतात, जसा सूर्य उगवतो आहे. यामुळे शरीर शांतपणे जागे होते.