स्टॅनफोर्ड : हे एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटाची सुरुवात वाटू शकते, पण शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पहिल्याच प्रयत्नात पूर्णपणे नवीन संसर्गजन्य विषाणू डिझाइन करू शकते. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील तज्ञांनी ‘ईवो’ नावाचे एक ‘एआय’ टूल वापरले, जे जीनोम (एखाद्या जीवाच्या जनुकीय सूचनांचा संपूर्ण संच) अगदी सुरुवातीपासून तयार करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या टूलने विशिष्ट बॅक्टेरियाला (जीवाणूंना) संक्रमित करून त्यांना नष्ट करण्याची क्षमता असलेले विषाणू तयार केले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील कॉम्प्युटेशनल बायोलॉजीचे प्रोफेसर आणि या अभ्यासाचे लेखक ब—ायन ही म्हणाले की, ‘पुढील पायरी म्हणजे एआय-निर्मित जीवन असेल.’
जरी ‘एआय’ द्वारे तयार केलेले हे विषाणू ‘बॅक्टेरियोफेज’ आहेत, म्हणजे ते केवळ बॅक्टेरियाला संक्रमित करतात, मानवांना नाही; तरीही काही तज्ञांना भीती वाटते की, अशा तंत्रज्ञानामुळे नवीन महामारी सुरू होऊ शकते किंवा अत्यंत धोकादायक जैविक शस्त्र तयार होऊ शकते. मायक्रोसॉफ्टचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी आणि संगणक शास्त्रज्ञ एरिक हॉर्व्हिट्झ यांनी इशारा दिला आहे की, ‘एआय’चा गैरवापर घातक जीव तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. एआय-समर्थित प्रोटीन डिझाइन हे सध्या ‘एआय’ च्या सर्वात रोमांचक आणि वेगवान क्षेत्रांपैकी एक आहे, परंतु हा वेग संभाव्य दुर्भावनापूर्ण वापरांबद्दलही चिंता निर्माण करतो.’ त्यांनी धोके व्यवस्थापित करण्यासाठी सक्रिय, दक्ष आणि सर्जनशील राहण्याची गरज व्यक्त केली.
या अभ्यासात, टीमने ईवो नावाचे ‘एआय’ मॉडेल वापरले. हे मॉडेल ‘चॅट जीपीटी’ सारखेच आहे. ‘चॅट जीपीटी’ला लेख, पुस्तके आणि मजकूर संभाषणांवर प्रशिक्षित केले जाते, त्याचप्रमाणे ‘ईवो’ला दशलक्षो बॅक्टेरियोफेज जीनोमवर प्रशिक्षित केले गेले आहे. या मॉडेलचा वापर नवीन विषाणू जीनोम तयार करण्यासाठी करण्यात आला. संशोधकांनी एआय-निर्मित हजारो अनुक्रमांचे (sequences) मूल्यांकन केले आणि त्यापैकी 302 व्यवहार्य (viable) बॅक्टेरियोफेज निवडले. या अभ्यासात असे दिसून आले की त्यापैकी 16 विषाणू मानवांमध्ये आजार निर्माण करणार्या सामान्य जीवाणू एशेरिचिया कोलाय ( E. coli ) च्या स्ट्रेन्सचा (प्रकारांचा) शोध घेऊन त्यांना नष्ट करण्यास सक्षम होते.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील बायोइंजिनिअर आणि अभ्यासाचे सह-लेखक सॅम्युअल किंग म्हणाले, ‘हा एक खूपच आश्चर्यकारक परिणाम होता, जो आमच्यासाठी खरोखर रोमांचक होता. कारण हे दर्शवते की ही पद्धत संभाव्यत: उपचारांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.’