वॉशिंग्टन : पृथ्वीच्या शेजारचा लाल ग्रह मंगळावर ‘नासा’चे अनेक रोव्हर फिरत आहेत. त्यांच्या कॅमेर्याने टिपलेली मंगळाची अनेक छायाचित्रे लोकांचे लक्ष वेधून घेतात. यापैकीच एक रोव्हर असलेल्या ‘पर्सिव्हरन्स’ने मंगळावरील सूर्यग्रहणाचे व्हिडीओ चित्रण केले आहेत. ज्यावेळी मंगळाचा चंद्र फोबोस सूर्यासमोरून जात होता, त्यावेळी एखाद्या कार्टूनच्या ‘गुगली’ डोळ्यांसारखे चित्र निर्माण झाले. जणूकाही हा डोळा खाली पाहत मंगळभूमीवर नजर ठेवत असावा, असे दिसले!
या व्हिडीओत बटाट्याच्या आकाराचा मंगळाचा चंद्र हा सूर्य आणि मंगळाच्यामधून जात एकाक्षणी सरळ रेषेत आला. त्यामुळे सूर्याच्या तबकडीचा एक हिस्सा झाकोळला गेला. पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावर मिशनच्या 1285 व्या दिवशी म्हणजेच 30 सप्टेंबरला आपल्या मास्टकॅम-झेड कॅमेर्याने हे द़ृश्य टिपून घेतले. पर्सिव्हरन्सच्या एक्स हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्हाला कुणी तरी डोळे रोखून पाहत आहे अशी जाणीव कधी झाली आहे का? ज्यावेळी मंगळाचा चंद्र फोबोसला जात असताना मी पाहिले त्यावेळी मलाही असेच वाटले! या गुगली डोळ्यातील काळे बुबुळ म्हणजे मंगळाचा बटाट्याच्या आकाराचा चंद्र असून, पांढरे बुबुळ म्हणजे आपला सूर्य. फेब—ुवारी 2021 मध्ये मंगळावरील विवरात उतरल्यापासून पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळाचा चंद्र फोबोसची अनेक छायाचित्रे कॅमेर्यात टिपून घेतली आहेत. यापूर्वी क्युरिऑसिटी रोव्हरनेही 2019 मध्ये त्याचा एक व्हिडीओ कॅप्चर केला होता; तर अपॉर्च्युनिटी रोव्हरने 2004 मध्ये त्याचे एक छायाचित्र टिपले होते. मंगळाच्या फोबोस या चंद्राचा सन 1877 मध्ये एसफ हॉल यांनी शोध लावला होता. त्यांनी त्याचे नाव रोमन देवता मार्ससारखीच ग्रीक देवता एरीसच्या अनेक मुलांपैकी एकाच्या म्हणजेच फोबोसच्या नावावरून ठेवले होते. हा चंद्र दिवसातून तीनवेळा मंगळाची प्रदक्षिणा करतो.