नवी दिल्ली : मंगळावर जीवनाच्या संकेतांचा शोध घेत असतानाचा एक लांबलचक पांढरा ढग आढळून आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा ढग मंगळाच्या आकाशात दिसून येत आहे. मात्र, आता या ढगाबाबतचे गूढ उलगडले आहे. यामध्ये भारताच्या मंगळयानाचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
मंगळावरील या ढगाची निर्मिती सूर्यमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी असलेल्या एका पर्वतानजीक होते. मंगळावर एक सूर्यमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. याचे नाव 'ऑलिम्पस मॉन्स' असे आहे. हा ज्वालामुखी पर्वत मंगळाच्या दक्षिणेस स्थित आहे. याच्यावर प्रत्येक वर्षी एक लांबलचक शेपटी दिसून येते. ही शेपटी म्हणजेच लांबलचक ढग होय.
उल्लेखनीय म्हणजे 'ऑलिम्पस मॉन्स'वर तयार होणार्या या ढगाचा आकार एक दिवसात किमान 80 वेळा बदलत असतो. काहीवेळा याची लांबी तब्बल 1800 कि.मी. व रुंदी 150 कि.मी. असते. अशा या ढगाला 'अर्सिया मॉन्स एलाँगेटेड क्लाऊड' म्हणून ओळखले जाते.
युरोपियन स्पेस एजन्सी व नासाने या ढगाचा अभ्यास केला असता असे आढळून आले की, हा ढग सूर्योदयापूर्वीच तयार होतो आणि त्याची लांबी तासाला 600 कि.मी. इतक्या वेगाने वाढत जाते. तसेच तो सूर्यप्रकाश येताच नाहीसा होतो. युरोपियन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटरने या ढगाचे छायाचित्र कॅमेराबद्ध केले आहे. या कामी भारताच्या मंगळयानानेही मदत केली आहे.