पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने गेल्या १५ वर्षांपासून संघासाठी सातत्याने मोठे योगदान दिले आहे. दरम्यान, भारतापुढे आगामी काळात वनडे विश्वचषक आणि आशिया चषकात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे चाहत्यांचे विराट कोहलीच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. विराट कोहलीने वनडे विश्वचषकात नैसर्गिक खेळ खेळल्यास तो भारतासाठी महत्वपूर्ण ठरु शकतो. आगामी विश्वचषकात तो धावांचा पाऊस पाडेल, असे भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल म्हणाले आहेत.(Virat Kohli In World Cup)
चॅपेल म्हणाले, मी भारताचा प्रशिक्षक होतो तेव्हा सचिनने मला कॉल केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेटण्यासाठी आल्यानंतर सचिनने विचारले की, वेळेनुसार फलंदाजी करणे अवघड का होते? प्रत्युत्तर देताना मी म्हणालो वेळेनुसार आपण बऱ्याच गोष्टी शिकतो आणि सूचना आपल्या लक्षात असतात. जेव्हा तुम्ही युवा असतात तेव्हा चेंडू फटकावण्याचा विचार करत असतात. मात्र, वेळेनुसार सर्वकाही बदलते. तुम्ही स्वत:च्या प्रतिष्ठेचा विचार करु लागतो. तुमच्यावर दबाव असतो, या सर्व बाबींचा तुमच्या फलंदाजीवर परिणाम होतो. त्यामुळे मानसिक दृष्ट्या तयारी करणे गरजेचे आहे. शिवाय स्वतंत्रपणे फलंदाजी करणे महत्वपूर्ण ठरते. (Virat Kohli In World Cup)
कोहलीनेही टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध स्वतंत्रपणे फलंदाजी केली होती. त्यामुळेच त्याला मोठी खेळी करता आली. त्याने या खेळीमध्ये पारंपारिक पद्धतीने चेंडू फटकावले होते. मला खात्री आहे की, कोहली आगामी वर्ल्डकपमध्ये अशाच प्रकारे फलंदाजी करेल. विश्वचषकात विराट चांगली कामगिरी करेल त्यामुळे भारतासाठी तो महत्वपूर्ण ठरणार आहे, असेही चॅपेल म्हणाले आहेत. (Virat Kohli In World Cup)