टी-२० वर्ल्डकपमध्ये आज (दि.३१) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघानी या स्पर्धेतील आपला पहिला सामना गमावला आहे. (Twenty20 World Cup IND vs NZ) त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वपूर्ण आहे.
आजचा सामना जिंकणारा संघाचा सेमीफायनलसाठीचा दावा अधिक मजबूत होणार आहे. हा सामना कर्णधार विराट कोहली याच्यासाठीही खास आहे. कारण या सामन्यात तो तीन नवे रेकॉर्ड आपल्या नावावर करु शकतो. तसेच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचाही रेकॉर्ड तोडण्याची संधी त्याला आहे.
कर्णधार म्हणून सर्वाधिक अर्धशतके व त्यापेक्षा अधिक धावा झळकविण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावावर होता. मात्र अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात बाबरने अर्धशतकी खेळी करत विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आता आजच्या सामन्यात दमदार खेळी करत कर्णधारपदी सर्वाधिक अर्धशतके करण्याचा विक्रम विराट अबाधित ठेवू शकतो. टी-२० वर्ल्डकपमध्ये अर्धशतक व त्यापेक्षा अधिक धावा करणारे कर्णधार पुढीलप्रमाणे, कंसात (सामने) विराट कोहली (भारत) १३ (४४ ), बाबर आजम (पाकिस्तान) १३ (२६), केन विलियम्सन (न्यूझीलंड ) ११ (५० ), एरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) ११ (५१), इयॉन मोर्गन (इंग्लंड) ९ (६० ).
आंतररराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत २९० चौकार लगावले आहेत. आजच्या सामन्यात त्याने आणखी सहा चौकार फटकावले तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक चौकार फटकावणार खेळाडू होण्याचा बहुमानही विराटच्या नावावर होईल. तर १० चौकार लगावले तर टी२० सामन्यांमध्ये ३०० चौकार फटकावणारा तो जगातील पहिला खेळाडू होईल. या स्पर्धेतआर्यलंडचया पॉल स्टर्लिंगने २९५ चौकार फटकावत पहिल्या स्थानावर आहे. मात्र आर्यलंड वर्ल्डकपमधून बाहेर पडल्याने सर्वाधिक चौकार लगावणारा खेळाडू होण्याचा बहुमान विराटच्या नावावर होउ शकतो.
२४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहलीने दमदार खेळीचे प्रदर्शन केले. त्याने ४९ चेंडूत ५७ धावा केल्या. या सामन्यात त्याने ५ चौकार तर १ षटकार लगावला होता. आजच्या सामन्यातही हाच फॉर्म कायम ठेवण्याचा त्याचा मानस असणार आहे. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक ३ हजार २१६ धावा विराटच्याच नावावर आहेत. तर रोहित शर्मा आणि मार्टिन गुप्टिल यांना तीन हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
टी २० च्या आतापर्यंत ९१ आंतरराष्ट्रीय सामन्यांत विराट कोहलीने ९१ षटकार लगावले आहेत. स्पर्धेत विराटने ९ षटकार खेचले तर त्याच्या नावावर १०० षटकार फटकविण्याचा विक्रम होईल. अशी कामगिरी करणारा तो जगातील आठवा फलंदाज ठरेल.