Vijay Wadettiwar 
Latest

Vijay Wadettiwar : मोदी सरकार निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे गोध्रा कांड घडविण्याच्या तयारीत – वडेट्टीवार

सोनाली जाधव

चंद्रपूर पुढारी वृत्तसेवा : दंगली पेटविल्याशिवाय भाजपला सत्ता मिळत नाही. गुजरात मधील गोध्रा कांडानंतर भाजपला बळ मिळाले. देशात पुन्हा सत्ता मिळविण्याकरिता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी दुसरा गोध्राकांड घडविण्याच्या तयारीत आहे. येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन आहे. या कार्यक्रमाला देशभरातून लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहेत. रामलल्लाचे दर्शन् घेऊन निघणाऱ्या कारसेवकांसोबत दंगली घडविल्या जातील, उद्रेक केला जाईल. यात काही कारसेवकांचा आवश्यकता पडल्यास जीव जाईल. त्या विश्वासावर देशातील सत्तेसाठी दावा ठोकला जाईल, असा खळबळजनक आरोप राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (दि.१९) चंद्रपूरात केला. दरम्यान पर्यायी संविधान तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. (Vijay Wadettiwar )

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, संदिप गड्डमवार, डॉ. विजय देवतळे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे झालेल्या स्फोटातील आरडीएक्स कुठून आले याचा शोध अद्याप लागला नाही, आरोपी मिळाले नाहीत. गुजरातच्या गृहमंत्र्यांची हत्या झाली, त्या प्रकरणातील आरोपीही मिळाले नाही हे कसे काय शक्य आहे असेही वडेट्टीवार म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड घट झाली आहे.

Vijay Wadettiwar : भ्रष्टाचारी कोण ?

'मेरी माटी, मेरा देश' या उपक्रमात सेल्फीसाठी देशातील केवळ दोन टक्के लोकांनीच प्रतिसाद दिल्याने हे सिद्ध झाले आहे. ना खाऊंगा, ना खाणे दुंगा अशी घोषणा देणाऱ्या मोदी सरकारवर कॅगने ताशेरे ओढले आहे. केंद्राच्या सात योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली असे कॅग म्हणत आहे. तेव्हा भ्रष्टाचारी कोण ? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे असेही वडेट्टीवार म्हणाले. देशात कायदे झपाट्याने बदलले जात आहे. त्यामुळे २०२४ नंतर निवडणुका होणारच नाही. अशी स्थिती आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून मुख्य सरन्यायाधिशांना वगळण्याचे विधेयक मांडण्यात आले आहे. १९२७ चा वन कायदा बदलला आहे. त्यामुळेच आता उद्योगपतींना खाण वाटप सोपे झाले आहे. राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण आहे. स्वातंत्र्यदिनी झेंडा कुणी फडकवायचा यावरही एकमत झाले नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनीच झेंडावंदन केले यावरून या सरकारमध्ये काय सुरू आहे हे दिसून येते. शिंदे गटाचे आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत. अनेकजण मंत्री पदाचे बाशिंग बांधून आहेत. मात्र सप्टेंबर अखेर पर्यंत शिंदे यांना नारळ दिला जाईल असा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

२० – २० मॅच खेळणारा खेळाडू हवा होता

येणारे वर्ष निवडणुकांचे आहे. मात्र येत्या डिसेंबर महिन्यात देखील राज्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीचा निकाल बघून लोकसभा निवडणुका घेतल्या जाईल असा प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही वडेट्टीवार म्हणाले. पायगुण चांगला आहे. विरोधी पक्ष नेते पदाची दुसऱ्यांदा संधी मिळालेला काँग्रेसचा एकमेव कार्यकर्ता आहे. श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी व  खरगे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. काँग्रेसला राज्यात २० – २० मॅच खेळणारा खेळाडू हवा होता. त्यामुळेच मला विरोधी पक्ष नेते पद दिले असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT