कोल्हापूरमध्ये मतदानाच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी एक धक्कादायक व्हिडिओ जाहीर करत सत्ताधारी आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. एका खासगी कंत्राटदार व्यक्तीकडून तब्बल 40 लाख रुपये घेतल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती स्वतः पुढे येऊन सत्ताधारी आमदारांना मतदानाआधी 40 लाख रुपये दिल्याचा दावा करताना दिसत आहे. हा व्यवहार कंत्राटाच्या कामाशी संबंधित असल्याचेही त्या व्यक्तीने सांगितले आहे. या आरोपामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.