पुढारी ऑनलाईन: मुळचे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले हर्षवर्धन सिंग हे सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे नवीन दावेदार मानले जात आहेत. हर्षवर्धन सिंग हे एरोस्पेस अभियंता असून, त्यांनी 'मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरत आहे', अशी माहिती एक व्हिडिओ ट्विट करत दिली आहे. (US presidential race)
पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. त्याची जय्यत तयारी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आतापासून सुरू केली आहे. दरम्यान भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले सिंग यांनी देखील नशिब आजमावायचे ठरवले आहे. निक्की हेली आणि विवेक रामास्वामी यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत सामील होणारे सिंग हे तिसरे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक (US presidential race) ठरले आहेत.
सिंग यांनी स्वतःला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी एकमेव स्वच्छ उमेदवार म्हणून वर्णन केले आहे. कारण त्यांनी कधीही कोविड लसीकरण घेतलेले नाही. एरोस्पेस अभियंता हर्ष वर्धन यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेतील लोकांना सध्या टेक आणि फार्मास्युटिकल कंपन्यांच्या भ्रष्टाचाराचा सामना (US presidential race) करावा लागत आहे.
अमेरिकेतील कौटुंबिक मूल्ये आणि पालकांच्या हक्कांवर थेट हल्ला होत आहे. जिथे मोठ्या औषध कंपन्या सरकारच्या सहकार्याने सर्व लोकांना प्रायोगिक लस लागू करण्यास भाग पाडून नफा कमवत आहेत. त्याचवेळी, टेक कंपन्या आमच्या गोपनीयतेला देखील लक्ष्य करत असल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
आमच्या राजकीय आणि निषेधाच्या दृष्टिकोनावर सेन्सॉरशिप लादली जात आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेची मूल्ये रुजवण्यासाठी कणखर नेतृत्व लागते. या सर्व कारणांमुळेच मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झालो आहे, असेही हर्षवर्धन सिंग यांनी स्पष्ट केले आहे.