गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे सांगण्याची गरज नाही. एकमेकांचे उणेदुणे काढण्यापेक्षा पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्या, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांना टोला लगावला. गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित पवार आज पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता गडचिरोलीत आले होते. सुरुवातीला त्यांनी शिवणी गावात जाऊन पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
शिंदे गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. यासंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे सांगण्याची गरज नाही. एकमेकांचे उणेदुणे काढण्यापेक्षा पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अजित पवार यांनी शरसंधान साधले. पूरस्थितीची पाहणी करण्याकरिता अजित पवारांनी एवढा उशिरा का लावला, अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले, आम्ही देखावा करीत नाही. प्रत्यक्ष मदत करतो. बावनकुळेंनी मीडियापुढे बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असा उलट टोला पवार यांनी लगावला.
अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही यांनी शिंदे, फडणवीसांना धारेवर धरले. महिना होऊनही विस्तार न होणे हे चांगलं नाही. १६५ आमदारांचा पाठिंबा आहे असं म्हणता, मग मंत्रिमंडळ विस्तारास तुम्हाला अडवलं कुणी, असा प्रश्न पवार यांनी केला. विस्तार झाला असता तर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या व्यथा सरकारपर्यंत तत्काळ पोहचल्या असत्या. शिवाय त्यांना मदतही मिळाली असती. मुंबईत बसणे आणि पालकमंत्री नेमून काम करवून घेणे यात फरक आहे, असे पवार म्हणाले. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अद्याप पंचनामे झाले नाहीत. केवळ शेतकऱ्यांचे आधारकार्ड आणि अर्ज घेण्यात येत आहेत. पंचनामे झाल्याशिवाय मदत कशी मिळणार, असा प्रश्न करुन पवार यांनी निकष बाजूला ठेवून हेक्टरी ७५ हजारांची सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली.
तेलंगणातील मेडिगड्डा प्रकल्पाचा सिरोंचा तालुक्याला मोठा फटका बसला. याबाबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी. प्रसंगी केंद्र सरकारनेही हस्तक्षेप करावा, अशी मागणी करुन अजित पवार यांनी हा प्रश्न आपण विधीमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ.कारेमोरे उपस्थित होते.
हेही वाचलंत का?