पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेचा फटका फळांचा राजा असलेल्या हापूसलाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. प्रमाणापेक्षा जास्त उष्णता वाढल्याने आंबा पिकताना तो आतून खराब होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हापूसच्या रंगासह त्याची चवही कमी झाली आहे.
राज्यातील सरासरी तापमान चाळीस अंशांवर गेल्याने हापूसला सध्या त्याची चांगलीच झळ बसत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच लहरी वातावरणामुळे कोकणातील हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात झाडांवर अवघी 25 टक्केच फळे राहिली.
या काळात बाजारातील आवक घटून हापूसला चांगले दर मिळत होते. मात्र, आता उन्हाचा चटका वाढल्याने काढणीला आलेला आंबा देठाशी काळा पडत आहे. मार्केटमध्ये आंबा दाखल झाल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जास्त तापमान असल्याने आंबा गरम होऊन कोयीजवळ खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.
एका डझनामागे एक ते दोन हापूस आंबे खराब निघत आहेत; तर 4 ते 7 डझनाच्या पेटीमध्ये हेच प्रमाण तब्बल एक डझन एवढे आहे. लहरी वातावरणामुळे यंदा पहिल्या टप्प्यात फक्त 25 टक्केच उत्पादन आहे. त्यात यंदा पहिल्यांदाच तापमानाचा पारा चाळीस अंशांवर गेल्याने आंबा खराब निघण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. आंबा खराब होऊ नये, यासाठी तो थंड ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, उष्णता जास्त असल्याने सर्व प्रयत्न अपुरे ठरत आहेत. जोपर्यंत वातावरणात जास्त उष्णता राहील, तोपर्यंत हीच परिस्थिती राहील, असे हापूस विक्रेते युवराज काची यांनी सांगितले.