वनपरिक्षेत्रातील पाणवठे कोरडे  
Uncategorized

औरंगाबाद ; वनपरिक्षेत्रातील पाणवठे कोरडे; वन्य प्राण्यांची भटकंती, वन विभागाचे दुर्लक्ष!

निलेश पोतदार

अजिंठा ; पुढारी वृत्तसेवा अजिंठा घाटातील जंगलात फुटा दरवाजाजवळील तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यात गेल्या काही महिन्यांपासून पाणी भरण्यात आले नाही. यामुळे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. याबाबीकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हेतू पुरस्सर दुर्लक्ष दिसून येत आहे. अजिंठा वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी डोंगरात वनविभागाने ठिकठिकाणी कृत्रिम १० पाणवठे तयार केले होते. मात्र वाढत्या उन्हामुळे हे पाणवठे आजच्या घडीला कोरडठाक पडले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यास पाणीच मिळत नसल्याने हे प्राणी पाण्याच्या शोधात भटकताना दिसून येत आहेत.

या वनपरिक्षेत्रात पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने वन्य प्राणी, मुके जीव पाण्यावाचून तडफडत आहेत. त्यातच पुरेसे खाद्यही मिळत नसल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे. वन्य प्राण्यांचे हे स्थलांतर धोक्याचे असून, प्राण्यांसाठी पाण्याची पर्याय व्यवस्था करावी अशी मागणी वन्यप्रेमी कडून होत आहे .अजिंठा वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जंगलात कुपनलिकांव्दारे खोदून कृत्रिम पानवठे तयार करून त्यात नियमितपणे पाणी भरले जात होते, मात्र सध्या कडक ऊन असताना पाणवठ्यात पाणी भरण्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्‍याचे दिसून येत आहे. त्‍यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

दरम्यान पिंपळदरी वसई गावाच्या सभोवताली अजिंठा लेणीच्या डोंगर रांगा आहेत. घणदाट जंगलाने वेढलेल्या या परिसरात वन्य प्राण्यांचे क्‍वचीत दर्शन घडते. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधासाठी हे प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेतात. नीलगाय, हरिण, ससा, कोल्हे, लांडगे, तडस, मोर यांच्यासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी वनवन होत आहे.

पाण्याच्या शोधात येणाऱ्या प्राण्यांवर भटकी कुत्री हल्‍ला करतात. बऱ्याचवेळा रात्रीच्या काळोखात हे प्राणी विहिरीत कोसळतात, तर रस्‍ता ओलांडताणा भरधाव वाहनांच्या धडकेत प्राणाला मुकतात.

मुख्यतः वानरांनी परिसरातील वस्तीकडे आपला मोर्चा वळविला आहे. गाव परिसरातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी वानरांचे टोळकेही दृष्टीस पडत आहेत. मात्र ही वानर गावातील घरांच्या छतांवर उड्या मारून पत्रे, कौलारू घरे यांची नासधूस करत आहेत. रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी वन्य प्राण्यांच्या भटकंतीने ग्रामस्थ मात्र हैरान झाले आहेत. त्यामुळे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेले हाल लक्षात घेत सर्वच कृत्रिम पाणवठ्यात त्वरित पाणी सोडून या मुक्या जीवांची तृष्‍णा भागवावी अशी मागणी वन्यप्रेमी आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT