Uncategorized

औरंगाबाद : औषधांची गोणी डोक्यावर घेऊन आरोग्य कर्मचार्‍यांची अशीही वारी

अनुराधा कोरवी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातून वारीला जाणार्‍या दिंड्यांतील वारकर्‍यांना आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेने आरोग्य पथक पाठविलेले आहे. जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांना खासगी गाड्या दिमतीला देणार्‍या प्रशासनाने आरोग्य सेवकांना मात्र गाडी नाकारल्याने, पथकातील आरोग्य सेवक औषधांची गोणी डोक्यावर घेऊन वारीसोबत पायी जात आहेत. प्रशासनाच्या अवकृपेने त्यांच्यावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे.

विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने, हरिनामाचा जयघोष करत वारकरी हजारो किलीमीटरचे अंतर सहज पार करून जातात. विठ्ठल-रुखुमाईची मूर्ती, तुळस डोक्यावर घेऊन वारीत पायी चालणारे वारकरी सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. या वारीत औषधांची गोणी डोक्यावर घेऊन चालणारे आरोग्यसेवकही लक्ष वेधत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातून जाणार्‍या दिंड्यांसाठी पिण्याचे पाणीपुरवठा करणारे टँकर आणि आरोग्य पथक पाठविले आहे. एका-एका दिंडीसोबत एक टँकर आणि एक आरोग्य सेवक व आरोग्य सहाय्यक देण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे यंदा टँकर आणि आरोग्य पथकासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली गेली नाही. माजी बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी वारीसोबत टँकर आणि आरोग्य पथक देण्याची मागणी केली. यानंतर टँकरसाठी 22 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली, तर वारकर्‍यांना आरोग्य सेवा देण्यासाठी पथक नेमून 20-25 जणांची नियुक्‍ती करण्यात आली. आरोग्य सेवकाकडे सर्दी, खोकला, ताप या आजारांची औषधी, ओआरएस, मास्क आदी साहित्यही देण्यात आले.

हे साहित्य टँकरमध्ये ठेवा असे सांगत गाडी नाकरण्यात आली आहे, मात्र वारीत गेल्यावर टँकरमध्ये वारकर्‍यांचे सामान पाहून आरोग्य सेवकांना औषधांची गोणी डोक्यावरून वाहून न्यावी लागत आहे. ही औषधी घेऊन जाण्यासाठी त्यांना गाड्या देण्याच्या सूचनाही नियुक्‍ती आदेशात दिलेल्या आहेत, मात्र झारीतील शुक्राचार्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT