Uncategorized

नवरात्रोत्सवात होणार सुदृढ स्त्रीशक्तीचा जागर; केडीएमसीकडून विशेष मोहीम

मोहन कारंडे

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेतली आहे. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या मोहिमेंतर्गत केडीएमसीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरात 18 वर्षांवरील तरूणी व गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घटस्थापना ते विजयादशमी या 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सवाच्या कालावधीत 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

स्त्रीशक्तीचा आदर व काळजी या दृष्टीकोनातून नवरात्रोत्सवाच्या कालावधीत 18 वर्षांवरील महिला आणि गरोदर मातांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशनदेखील करण्यात येणार आहे. युवती आणि गरोदर मातांना त्यांच्या आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणीसह औषधोपचार सेवा देण्यात येणार आहे.

या मोहिमेचा प्रारंभ सोमवारी 26 सप्टेंबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी महानगरपालिकेची रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर विजयादशमीपर्यंत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये डॉक्टरांमार्फत 18 वर्षांवरील तरूणी व गरोदर मातांची तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशन करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये प्रामुख्याने पोषणविषयक माहिती, मातांचे वजन-उंची तपासणे, रक्तदाब तपासणे, रक्त व लघवी तपासणी, लसीकरण, दंतरोग तपासणी, इत्यादी सेवा आणि समुपदेशन देण्यात येणार आहे. गरोदर मातांमधे अतिजोखमीच्या मातांची सोनोग्राफी करण्यात येईल. तसेच 30 वर्षांवरील महिलांची कर्करोग तपासणी, रक्तदाब तपासणी आणि मधुमेह तपासणीदेखील या शिबिरांमध्ये करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा, यासाठी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या तरूणी व गरोदर मातांना आशा वर्कर्स, तसेच अंगणवाडी सेविकांमार्फत माहिती देण्यात येणार आहे.

महिलांचे आरोग्य सुदृढ रहावे याकरिता शासनाच्या या विशेष उपक्रमास यशस्वी करण्याकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील तरूणी व गरोदर मातांनी घराजवळ असलेल्या महानगरपालिकेच्या रुग्णालय अथवा नागरी आरोग्यकेंद्रांत 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जाऊन आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT