Uncategorized

Ganeshotsav 2023 : पुण्यात गणेशोत्सवात पोलिस अन् कार्यकर्त्यांचेही जागते रहो..

अमृता चौगुले

पुणे : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना पोलिस आता घातपात विरोधी प्रशिक्षण देणार आहेत. दहशतवाद विरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक दाखवून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथके काम करणार आहेत. बीडीडीएसची पाच पथके तयार करण्यात आली असून, महत्त्वाच्या मंडळांच्या परिसराची ही घातपात विरोधी कृत्याच्या अनुषंगाने प्रात्यक्षिक दाखवून तपासणीदेखील करणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना संशयास्पद काही आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दोन महिन्यांपूर्वी पुण्यातील कोथरूड परिसरातून तीन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी पकडले. त्यातील एकजण पळून गेला. पुढे या दोघांकडे केलेल्या तपासात दहशतवादी कारवाईचा मोठा कट समोर आला. त्यामध्ये या दोघांचे धागेदोरे थेट बंदी असलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेशी असल्याचे उघड झाले. त्यानंतर पुणे पोलिस, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि सध्या तपास करत असलेले एनआयए यांच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. त्यामध्ये पुणे,सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी येथे करण्यात आलेल्या बॉम्ब स्फोटाच्या चाचण्या तसेच पुण्यात बॉम्ब तयार करण्यासंदर्भातील दोन कार्यशाळा झाल्याचे तपासात समोर आले आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील पुण्यात जर्मन बेकरी आणि जंगली महाराज रस्ता, फरासखाना पोलिस ठाण्यासमोर बॉम्ब स्फोटाच्या घटना घडविण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथेदेखील दहशतवादी कृत्याच्या अनुषंगाने रेकी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. इसिसच्या संघटनेच्या संदर्भातील पकडण्यात आलेले दहशतवादी यांची पुण्याची लिंक मोठी आहे. त्यांना आर्थिक रसद पुरविणारे तसेच आसरा देणारे इसिसचा प्रचार प्रसार करणार्‍या बर्‍याच दहशतवाद्यांना पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी वैभवशाली परंपरा आहे. हा उत्सव पाहण्यासाठी जगभरातून भाविक व पर्यटक येतात. त्यामुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी वाढते. सर्वच मंडळांत मोठमोठे देखावे असल्याने गर्दीची वारंवारता इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात गणेशोत्सवात जास्त असते. त्यातही मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. तर विसर्जन मिरवणुका मोठ्या असतात. त्याचा फायदा देशविघातक कृत्य करणार्‍या व्यक्ती घेऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर पोलिस सज्ज झाले असून, मंडळाच्या कार्यकर्त्यांनादेखील त्यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

शहरात मोठा बंदोबस्त

बीडीडीएसची पाच पथके तयार करण्यात आली असून, ही पथके शहरातील सर्व परिमंडळांच्या हद्दीत जाऊन मंडळांच्या कार्यकर्त्यांना दहशतवाद विरोधी प्रात्याक्षिक दाखवून मार्गदर्शन करणार आहेत. विशेष शाखेकडून याबाबतचे आदेश काढण्यात आले आहे. तसेच सर्व पोलिस ठाण्यांनादेखील याबाबत सूचना देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले तसेच मंडळाच्या परिसरातील घातपात विरोधी तपासणी करून त्याचा अहवालसुद्धा सादर करण्याच्या सूचना बीडीडीएसच्या पथकांना देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव पोलिस दल (SRPF) शीघ्र कृती दले, बीडीडीएस, होमगार्ड, साध्या वेशातील गुन्हे शाखेची पथके असा तब्बल सात हजारांपेक्षा अधिक कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच त्यामध्ये मंडळांच्या कार्यकर्त्यांचीसुद्धा मदत घेतली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना घातपात विरोधी पथकाकडून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी बीडीडीएसची पाच पथके तयार करण्यात आली आहेत. दहशतवाद विरोधी प्रात्याक्षिक दाखवून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

– आर. राजा, पोलिस उपायुक्त,
विशेष शाखा.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT