पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: नोकरीनिमित्त दिवसभर अनेक महिला घराबाहेर असल्यामुळे त्यांना दिवाळीमध्ये फराळ बनविण्यास वेळ नसतो. त्यामुळे रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढत चालला आहे. तसेच, अनेक महिला दिवाळीत फराळ करून विकत असल्यामुळे त्यांच्यासाठी दिवाळी हे अर्थार्जनाचे साधन झाले आहे. बर्याच गृहिणींना दिवाळीचे फराळ आणि इतर वस्तू विक्रीतून रोजगार मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात बचत गट, महिला उद्योग यासारख्या संस्थामध्ये दिवाळीसाठी रेडिमेड फराळ तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये विविध प्रकारांचे लाडू, शंकरपाळे, वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा, चकली, अनारसे, करंजी आदी वस्तू बनवून त्याचे पँकिग करण्याचे काम सुरू आहे.
बचत गटांबरोबरच शहरातील अनेक महिलाही दिवाळीपुरता हा व्यवसाय घरोघरी करतात आणि त्यांच्याकडील मागणीही दरवर्षी वाढत असल्याचे दिसत आहे. विशेषत: घरगुती पद्धतीने तयार केलेल्या चकली, अनारसे अशा पदार्थांना मोठी मागणी असते. तयार फराळ खरेदी करण्यालाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे अनेक महिलांसाठी फराळ तयार करून त्याची विक्री हे व्यवसायाचे साधन झाले आहे.
शहरात पती-पत्नी दोघेही नोकरीला जाणार्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी दोन-तीन दिवस आधी रेडिमेड फराळ खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे सध्या लाडू, चिवडा, चकली आदी फराळांच्या पदार्थ बनविण्याचे काम जोरात असल्याचे दिसत आहे.
कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे यंदा फराळाच्या किमतीत प्रतिकिलो 50 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. खसखसच्या किंमतीमध्ये कमालीचे वाढ झाली असल्याने अनारसेंच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.
दरवर्षी महिनाभर आधीपासून फराळ बनविण्याचे काम सुरू होते. दिवाळीमध्ये 10 ते 15 जणी मिळून फराळ तयार करतो. यामध्ये महिलांना रोजगारही मिळतो आणि त्यांनाही दिवाळीमध्ये आर्थिक हातभार लागतो.
– अंकिता राऊत,
अध्यक्षा, सखी महिला बचत गट
हेही वाचा